थोडी जरी लाज, हिंमत असेल तर आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे बंडखोरांना आव्हान

‘फुटीरतावादी, गद्दार कसे असतात… इथून सुरत, गुवाहाटी, झाडी, गोवा आणि मग सकाळी 6 वाजता सगळं ओक्के. बंड चुकीच्या गोष्टींच्या विरोधात होतं. इथे कारण नसताना काही तरी कारणं दिली जात आहेत. स्वतःची राक्षसी महत्त्वाकांक्षा बघून ही गद्दारी केली.’

थोडी जरी लाज असेल, मनगटात हिंमत असेल तर आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बंडखोरांना दिले. राजकारण कमी केलं हीच आमची चूक झाली असे सांगतानाच, राजकारणात चांगल्या माणसांनाही स्थान असतं हे मी दाखवून देईन, असा निर्धारही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांनी आज ‘निष्ठा यात्रे’च्या अनुषंगाने बोरिवली, दहिसर, मागाठाणे येथील शाखांना भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. ‘बंडखोरांनी स्वतःच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी उद्धव साहेबांच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं हे त्यांनी दाखवून दिले,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ‘उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा तुमची आमदारांची जमवाजमव सुरू होती आणि त्यांना कोरोना झाला त्यावेळी तुम्ही सोडून गेलात,’ असाही निशाणा त्यांनी बंडखोरांवर साधला.

या ‘निष्ठा यात्रे’मध्ये युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, माजी नगरसेविका शुभदा गुढेकर, विधानसभा संघटक संतोष धनावडे, संतोष राणे, उपविभागप्रमुख राजन निकम, राजू खान, उदय रुधानी, आकांक्षा नागम, सुवर्णा प्रसादे, सायली सुखदरे, शाखाप्रमुख शाम मोरे, अनंत नागम, मनोज मोहिते, भास्कर मोरे, निखिल गुढेकर, सुनील राणे, सुषमा कदम, प्रतिभा वाडेकर, कला पानगळे, रेखा कदम, शिल्पा गुरव, संजना गीध आदी उपस्थित होते.

ज्यांना फसवून नेलेय त्यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दार खुले

बोरिवली येथील शाखा क्रमांक 12 मध्ये शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असे ते म्हणाले. ज्यांना पळवले गेले आहे, ज्यांना फसवून नेले आहे त्यांच्यासाठी ‘मातोश्री’ची दारे आजही खुली आहेत, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनेशी बंड करणारे टिकले नाहीत

शिवसेनेशी ज्यांनी बंड केले ते कधीही टिकले नाहीत, अशा इतिहासाची आदित्य ठाकरे यांनी यावेळी आठवण करून दिली. पंधरा वर्षांपूर्वी आपण स्वतः असे बंड पाहिले होते. ते बंड ज्यांनी केले ते कुठे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, असे ते म्हणाले.