
फडणवीस हे जातीपातीपलीकडचे नेते आहेत. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे बावनकुळे म्हणाले.
राज्यातील ‘ईडी’ सरकारमध्ये सगळे काही आलबेल असल्याचा आव आणला जात असला तरी मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून असलेल्या भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा कधीही राजकीय ‘गेम’ होऊ शकतो असे संकेत देणारे विधान आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. ‘मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत,’ असे बावनकुळे म्हणाले असून या विधानाने मिंधे गटाची हवा तंग झाली आहे.
नागपूर येथे संत जगनाडे महाराज स्मारक आणि आर्ट गॅलरीच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार यायला हवे, अशी इच्छा प्रदर्शित केली. त्यासाठी त्यांनी 2014 ते 2019 यादरम्यान फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दाखलाही दिला.
देवेंद्र फडणवीस हे जातीपातीपलीकडचे नेते आहेत. न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. जो समाज त्यांच्याकडे गेला त्यांच्यासाठी त्यांनी काम केले. मराठा, धनगर, ओबीसी अशा सर्व समाजांवरील अन्याय दूर करण्याचे काम फडणवीस यांनी केले. त्यामुळेच फडणवीसांना मुख्यमंत्री केले पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे बावनकुळे म्हणाले. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळातच हे कार्य व्हावे, असेही ते पुढे म्हणाले.
‘तो’ काळ महाराष्ट्रात परत आला पाहिजे
समाज कोणताही असो, त्यांना काही द्यायचा प्रश्न आला तेव्हा त्यांच्या सगळय़ा मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या. त्यामुळेच त्यांच्याप्रति आपण देणे लागतो. आपण सर्वांनी फडणवीस यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात परत आला पाहिजे, असे नमूद करत फडणवीस काय झाले पाहिजेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला त्यावर ‘मुख्यमंत्री’ असे उत्तर येताच बावनकुळेंनीही त्यात आपला सूर मिसळला.
मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले!
मिंधे गटाकडे गेलेले मुख्यमंत्रीपद राज्यातील भाजप नेतृत्वाला सुरुवातीपासूनच रुचलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास देवेंद्र फडणवीस राजी नव्हते. दिल्लीतून गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश देताच त्यांनी नाइलाजाने हे पद स्वीकारले हे जगजाहीर आहे. त्यानंतर काहीच दिवसांत तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर उघडपणे खदखद बोलून दाखवली होती. ‘आपण सगळय़ांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. दुःख निश्चितच झाले, पण ते पचवून आपण आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेलो,’ असे विधान पाटील यांनी केले होते.
शिंदेंना हटवण्याच्या हालचाली सुरू – पटोले
महाविकास आघाडीच्या नाकाखालून आम्ही त्यांचे सरकार घेऊन गेलो असे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर त्याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी समजून घेतला पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान पाहता शिंदेंना हटवून फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा शिंदे यांच्यासाठी अलर्ट आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
भाजप लवकरच शिंदेंचा गेम करणार – मिटकरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला भाजप कवडीचीही किंमत देत नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा गेम होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बावनकुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना केले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व असावे असे भाजपच्या मनात आहे. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आसुसलेला आहे हे आज उघड झाले आहे, असेही मिटकरी म्हणाले.

































































