कुटुंब रंगलंय गंडविण्यात! बनावट सोने देऊन सराफांची आर्थिक फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधी काही ग्रॅम खरे सोने विकून विश्वास संपादन केल्यानंतर बनावट सोने विकून सराफांना गंडविण्याच्या गोरखधंद्यात अख्ख कुटुंब रंगले आहे. सासरा, चार जावई, मुली आणि अन्य नातेवाईक सराफांना लाखोंचा गंडा घालत असून देशभरात त्यांनी अनेकांना लक्ष्य केले आहे, पण कधीच पोलिसांच्या हाती न लागणाऱया या टोळीतल्या चौघांच्या एल. टी. मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

झवेरी बाजार परिसरात जय ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गेल्या महिन्यात दुकान मालक एकटेच दुकानात असताना एक पुरुष व वृद्ध महिला तिथे गेले होते. सदर महिला ही आई असून ती गावावरून आल्याचे तिच्यासोबत असलेल्या भामटय़ाने सराफाला सांगितले. तेव्हा महिलेने तिच्याकडे असलेली धातूची माळ काढून ती सोन्याची आहे व विकायची असल्याचे सांगितले. सराफाचा विश्वास बसावा यासाठी आरोपीने त्या माळेतील 300 ग्रॅम वजनाचा तुकडा काढून सराफाला दिला. सराफाने तो तुकडा महावीर टंच येथे तपासून घेतला असता ते 22 पॅरेट सोने असल्याचे निष्पन्न झाले. काही दिवसांनी पुन्हा आणखी सोने विकायला येतो असे सांगितले व आपला मोबाईल नंबर देऊन दोघे निघून गेले. 27 ऑक्टोबर रोजी एका महिलेसह पुन्हा तिघे जण जय ज्वेलर्सच्या दुकानात गेले व त्यांच्या घरात खोदकामात सापडलेले सोने विकायचे असल्याची बतावणी करत धातूच्या माळा देऊन सराफाला 20 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी सराफाने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून लगेच गुह्याचा तपास सुरू केला.

अटक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या समाजातील आणखी काही लोक असाच सराफांना फसविण्याचा धंदा करतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आरोपी फसवाफसवी करत आहेत. देशभरात त्यांनी असे गुन्हे करूनसुद्धा एकदाही पकडले गेलेले नाहीत. एल. टी. मार्ग पोलिसांनी पहिल्यांदाच या आरोपींच्या हातात बेडय़ा ठोकल्या आहेत.

आरोपी कपडे विकायच्या बहाण्याने वेगवेगळय़ा ठिकाणी फिरून सराफांची रेकी करतात. वृद्ध किंवा थोडी लालच दाखवली की फसू शकतो असा सराफ सापडला की त्याला ते शिताफीने आर्थिक चुना लावतात. खोदकामात किंवा घरात मोठय़ा प्रमाणात जुन्या जमान्यातले सोने असल्याचे भासवून सुरुवातीला काही ग्रॅम खरे सोने द्यायचे. सराफाचा विश्वास बसल्यानंतर धातूचे दागिने सोन्याच्या भावात विकून पसार व्हायचे अशी या भामटय़ांची मोडस ऑपरेंडी असून त्यांनी देशभरात असे अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. चार आरोपींना कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

महिनाभरानंतर चौघे सापडले

सराफांना लक्ष्य करणारी ही टोळी पकडली जाऊ नये यासाठी आपला खोटा पत्ता सराफाला देतात. तसेच सराफाला गंडविल्यानंतर त्याला दिलेला मोबाईल नंबर बंद करतात. त्यामुळे आरोपींचा थांगपत्ता लागत नाही. त्यातच लाजेखातर किंवा सराफांमध्ये बोंबाबोंब नको म्हणून फसवणूक होऊनही पोलिसांत तक्रार देत नसल्याने आरोपींचे चांगलेच फावले होते. ते कधीही कुठेही जाऊन सराफांना चुना लावायचे काम करत होते, पण एल. टी. मार्ग पोलिसांनी कसून तपास करत दीपाली कलाणी (28), शंकर भाट (38), धर्मा कलाणी (33), रवी कलाणी (34) अशा चार आरोपींना शोधून काढले. त्यांच्याकडून सहा लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली, तर काही आरोपींचा सासरा नारायण बघेल तसेच अन्य दोन नातेवाईक मीना राठोड आणि सुभाष सलाट या तिघांचा शोध सुरू आहेत.