
शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटींवरून विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कर्जमाफी योजनेचे निकष शेतकऱ्यांसाठी अडचणीचे असून सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या निकषांमध्ये दुरुस्ती करावी अशी सूचना केली आहे.
राज्यातील शेतकरी कर्जमाफी, वादळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि इंडिया आघाडीची आगामी रणनीती या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. शेतकरी कर्जमाफी योजनेतील निकषांबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जमाफी चुकीची नाही, पण शेतकऱ्यांच्या तक्रारीही गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. योजनेतील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. कर्जमाफी योजनेतील निकषांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, असेही शरद पवार म्हणाले.

























































