
सामना प्रतिनिधी। नांदेड
विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात चालू असलेले शेतकर्यांचे धरणे आंदोलन आज बाराव्या दिवशी पेटले असून त्यामध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
मराठवाडा सीमेवर यावर्षी दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीवर तिसरा कालवा काढुन या सीमावर्ती गावांची तहान भागवावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. एवढे बारा दिवस उलटले असतानाही या ठिकाणचे राजकीय नेते व प्रशासन या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अयशस्वी ठरलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन आणखी उग्र रूप धरण्याची शक्यता आहे तरीही त्या शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार याकडे सर्व विदर्भ-मराठवाड्यातील 90 गावच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे हा प्रश्न तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येण्याची मागणी केली आहे .



























































