‘त्याला’ सतत विजयाचाच ध्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> नवनाथ दांडेकर

विजय त्याच्या अंगवळणीच पडलाय ,कारण तो सतत यशाच्या ध्येयाने झपाटलेला असतो. फुटबॉल लढत असो अथवा सहकाऱ्यांसोबतची सराव खेळ लढत. छोट्याशा अपयशाने तो नाराज होतो. अन मग ते अपयश पुसून टाकण्यासाठी अथक परिश्रम घेतो. त्यामुळेच यश सतत त्याच्या हातात हात घालून फिरताना दिसते. यंदाच्या फिफा विश्वचषकातही त्याचा धडाका आरंभापासून दिसला आहे. विश्वचषक गोल्डन बूटचा प्रबळ दावेदार मानला जाणारा हा खेळाडू आहे पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्तिआनो रोनाल्डो. दुसरा एक सुपरस्टार लिओनेल मेस्सी यशासाठी झगडत असताना रोनाल्डोनो मात्र स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपला धमाका दाखवत चाहत्यांना बेहद्द खुश केलेय. आपल्या कारकिर्दीतील ५१वी गोल हॅटट्रिक नोंदविणाऱ्यां रोनाल्डोच्या स्वभावाबाबत त्याच्या क्लब सहकाऱ्यांनी मात्र मोठा धसका घेतलाय. रोनाल्डोने तुम्हाला मेजवानीसाठी बोलावले तर मुळीच जाऊ नका. कारण त्याच्या फुटबॉलवेडाचा फटका तुम्हाला तिथेही बसेल असा ईशारा रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेड क्लबचा माजी संघसहकारी पॅट्रिस एव्हरा याने क्रिस्तिआनोच्या चाहत्यांना दिलाय.

रोनाल्डोचा माजी सहकारी पॅट्रिकने सांगितलेला किस्सा मोठा मजेदार आहे. तो पॅट्रिसच्याच शब्दात ऐकुया. फ्रान्सचा फुटबॉलपटू पॅट्रिस म्हणतो ,मँचेस्टर युनायटेडमधून खेळत असताना रोनाल्डोने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले. सुपरस्टारच्या घरी आपण मेजवानीसाठी जाणार याचा मोठा आनंद मला झाला होता. मी ठरल्या वेळेत रोनाल्डोच्या घरी गेलो. मला वाटले होते मेजवानीची जंगी तयारी असेल. पण कसले काय. जेवणाच्या टेबलवर साधे चिकन आणि काही सॅलड्स ठेवलेले होते. साधा कोणताही जुसही तेथे नव्हता. प्यायला साधे पाणीच ठेवलेले होते. आम्ही जेवायला सुरुवात केली. मला वाटले थोड्या वेळात मटण आणि अन्य खाद्यपदार्थ टेबलवर येतील. पण माझी पार निराशा झाली. रोनाल्डोने आपले खाणे संपवून इनडोअर फुटबॉल प्रॅक्टिस सुरु केली. थोड्या वेळाने मलाही सरावासाठी ये असे बजावले. मग काय, मी बापडा त्याच्या टू टच प्रॅक्टिसमध्ये सहभागी झालो. या सरावानंतरतरी काही चमचमीत खायला मिळेल असे वाटत होते. पण तिथेही साफ निराशा झाली. रोनाल्डो मला पोहण्याच्या व्यायामासाठी पूलमध्ये घेऊन गेला. मग मी न राहवून विचारले मित्रा तु मला जेवायला बोलावलेस कि उद्याच्या लढतीच्या सरावासाठी. रोनाल्डोने स्मित हास्य करीत आपला सराव सुरूच ठेवला होता. माझ्या पोटात मात्र भुकेने कावळे ओरडत होते. या गड्याला फुटबॉल आणि यश याशिवाय काहीही सुचत नाही हे मला त्या क्षणी उमगले. म्हणून रोनाल्डोच्या चाहत्यांनी त्याचे मेजवानीचे आमंत्रण मुळीच स्वीकारू नये हा मित्रत्वाचा सल्ला मी देईन. “गोलमशीन” हे नाव रोनाल्डोला चाहत्यांनी दिलेय ते योग्यच असल्याची खात्री मला पटलीय तुम्हालाही माझे मत पटेल.

हार त्याला मान्यच नाही
क्रिस्तिआनो हा यशाचा सतत भुकेला असतो. छोटेसे अपयशही त्याला बैचेन करून सोडते. असे सांगून पॅट्रिस म्हणाला ,क्लब फुटबॉल खेळताना एकदा रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडचा सहकारी रियो फर्डिनंड याच्याशी टेबलटेनिस खेळत होता. या खेळत रियोने रोनाल्डोला पराभूत केले. या छोट्या पराभवाने क्रिस्तिआनो पार हिरमुसला होता. आम्ही रियोच्या विजयाचे सेलेब्रेशन करीत असताना क्रिस्टियानोने आपल्या चुलतभावाला टेबलटेनिस टेबल विकत आणायला सांगितले. नंतर काही दिवस तो टेबल टेनिसचा कसून सराव करीत होता. काही दिवसांनी रियोला टेबलटेनिसमध्ये हरवल्यावरच रोनाल्डोच्या चेहेऱ्यावर पुन्हा आनंद दिसला. पोर्तुगालला यंदाचा विश्वचषक पटकावून देणे आणि परत सर्वोत्तम फुटबॉलर ‘किताब पटकावण्याचे स्वप्न उराशी बाळगून रोनाल्डो स्पर्धेत उतरलाय .रोनाल्डोला उज्वल यश मिळूनदे अशीच प्रार्थना त्याचे जगभरातील चाहते करीत आहेत.