आशियाई वाघांची पुन्हा डरकाळी; माजी जगज्जेत्या जर्मनीला जपानचा झटका

आशियाई वाघांची डरकाळी आजही कतारमध्ये ऐकायला मिळाली. मंगळवारी अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजयाची नोंद करून सौदी अरेबियाने खळबळ माजवली होती तर आज जपानने पूर्ण सामन्यावर दहशत असलेल्या जर्मनीला शेवटच्या 15 मिनिटांत हरविण्याचा चमत्कार करून दाखवत फिफा वर्ल्ड कपच्या ‘इ’ गटात विजयाची सलामी दिली.

आजच्या सामन्यात ‘यत्र तत्र’ जर्मनीच होती. त्यांचे फॉरवर्ड इतके आक्रमक होते की, पहिल्या हाफमध्येच ते आपला विजय निश्चित करताहेत, असे चित्र होते. इलकाय गुंडोगानने 33 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्याआधी सातव्या मिनिटाला डायझेन मइदाने भन्नाट गोल केला, पण नव्या तंत्राने तो गोल ऑफसाइड ठरवला. तसेच 45 व्या मिनिटाला जर्मनीच्या काय हावर्ट्झने गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती, पण रेफ्रींनी हा गोलसुद्धा नंतर ऑफसाइड जाहीर केला.

त्यानंतर 75 व्या मिनिटांपर्यंत जर्मनीने जपानवर एकामागोमाग हल्ले चढवले. दोनदा तर त्यांचे चेंडू गोलपोस्टच्या बारवर आदळले. तेव्हाच जर्मन गोलरक्षक मॅन्युएल नोयरच्या भिंतीला भेदत रित्सू डोआनने पहिला गोल केला तर 83 व्या मिनिटाला टकुमा असानोने गोलपोस्टला एक मीटर भेदत दुसरा गोल केला. तोच गोल चमत्कारिक ठरला.

पुन्हा शून्यगोल

एकीकडे गोलांचा वर्षाव होतोय, तर दुसरीकडे संघर्षपूर्ण लढतीचा शेवट गोलशून्य बरोबरीने होतेय. मंगळवारी आफ्रिकन टय़ुनिशियाने डेन्मार्कला गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर आज त्यांच्याच मोरोक्कोने गत उपविजेत्या क्रोएशियाला एकही गोल करू दिला नाही आणि एफ गटातील सामना 0-0 असा संपवला.
आजच्या लढतीवर क्रोएशियन खेळाडूंचेच वर्चस्व होते. तब्बल 70 टक्के खेळावर क्रोएशियानेच नियंत्रण राखले होते, पण आफ्रिकन मोरोक्कोने उपविजेत्यांच्या प्रत्येक आक्रमणाला गोलपोस्टमध्ये पोहचूच दिले नाही. तरीही लुका मोद्रिच, इव्हान पेरिसिच (क्रोएशिया), हाकिम जियेच, सोफियान बुफॉल, अचरफ हाकिमी (मोरोक्को) सारखे दिग्गज मैदानात असूनही एकही गोल न झाल्याचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
फ्रान्सचा जगज्जेत्यांचा थाट

फ्रान्सने आपल्या सलामीच्याच लढतीत जगज्जेत्याला साजेशा थाटात विजय नोंदवला. 1-0 ने पिछाडीवर असूनही ऑलिव्हिए जिरू, किलीयान एमबाप्पेच्या धडाकेबाज गोलांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची 4-1 अशी धुळधाण उडवत आपल्या वर्ल्ड कप अभियानाची जोशपूर्ण सुरुवात केली.

सामन्याचा आठव्याच मिनिटाला व्रेग गुडविनने गोल करून ऑस्ट्रेलियाला भन्नाट सुरुवात करून दिली. या गोलपूर्ण प्रारंभामुळे ऑस्ट्रेलिया जोशात होता, पण त्यांचा जोश फारवेळ चालला नाही. आद्रियान राबियोने 27 व्या मिनिटालाच अप्रतिम हेडरवर फ्रान्सला बरोबरी साधून दिली. त्यानंतर त्यांना आघाडी घेण्यासाठी फार थांबावे लागले नाही. 33 व्या मिनिटाला राबियोच्या चपळ पासला गोलमध्ये परिवर्तित करताना आपला पन्नासावा गोल ठोकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने बरोबरी साधण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. त्यातच ऑलिव्हिए जिरूने गोलपोस्टच्या समोर मारलेली सायकल किक थोडक्यात वाचली, अन्यथा मध्यंतरालाच फ्रान्सकडे 3-1 अशी आघाडी असती. तरीही मध्यंतरानंतर सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करताना 68 व्या मिनिटाला किलीयन एमबाप्पेच्या हेडरने फ्रान्सला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. मग 71 व्या मिनिटाला राबियोने एमबाप्पेच्या पासवर आणखी एका हेडरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि आपला दुसरा गोल ठोकला. त्याने हॅटट्रिकचेही प्रयत्न केले, पण ते थोडक्यात हुकले. या सामन्यात दुसऱया हाफमध्ये फ्रान्सने आक्रमण आणि बचावाचा जोरदार खेळ करीत ऑस्ट्रेलियाला अस्वस्थ केले आणि आणखी दोन गोलांची नोंद केली.

फिफा वर्ल्ड कप गुणतालिका
गट ए
संघ सा. वि. ड्रॉ प. गुण
नेदरलॅण्ड्स 1 1 0 0 3
इक्वॉडोर 1 1 0 0 3
सेनेगल 1 0 0 1 0
कतार 1 0 1 1 0
गट बी
इंग्लंड 1 1 0 0 3
वेल्स 1 0 1 0 1
अमेरिका 1 0 1 0 1
इराण 1 0 0 1 0
गट सी
सौदी अरेबिया 1 1 0 0 3
पोलंड 1 0 1 0 1
मेक्सिको 1 0 1 0 1
अर्जेंटिना 1 0 0 1 0
गट डी
फ्रान्स 1 1 0 0 3
टय़ुनिशिया 1 0 1 0 1
डेन्मार्क 1 0 1 0 1
ऑस्ट्रेलिया 1 0 0 1 0
गट ई
जपान 1 1 0 0 3
कोस्टारिका 0 0 0 0 0
स्पेन 0 0 0 0 0
जर्मनी 1 0 1 0 0
गट एफ
क्रोएशिया 1 0 1 0 1
मोरोक्को 1 0 1 0 1
बेल्जियम 0 0 0 0 0
कॅनडा 0 0 0 0 0

(टीप ः सा – सामने, वि – विजय, प – पराभव)
ही गुणतालिका जर्मन-जपान सामन्यापर्यंतची आहे.

आजच्या लढती
स्वित्झर्लंड-पॅमेरून (जी ग्रुप)
दुपारी 3.30 वाजता
उरुग्वे-द. कोरिया (एच ग्रुप)
सायं. 6.30 वाजता
पोर्तुगाल-घाना (एच ग्रुप)
रात्री 9.30 वाजता
बेल्जियम-कॅनडा (एफ ग्रुप)
मध्यरात्री 12.30 वाजता