जिंकूनही हरला मेक्सिको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकदा नशीब रुसलं की कितीही भन्नाट खेळ केला तरी त्याचा काहीएक उपयोग होत नाही. आज सौदी अरेबियाविरुद्ध मेक्सिकोचे नशीब रुसलेलेच. सामना 2-1 ने जिंकूनही मेक्सिकोचे आव्हान एका गोलाच्या फरकाने संपुष्टात आले आणि नशीब बलवत्तर असलेल्या पोलंडला अर्जेंटिनाविरूद्ध 0-2 ने मात खावी लागली. तरी ते गोलफरकामुळे फिफा वर्ल्डकपच्या सी गटातून अनपेक्षितरीत्या बाद फेरीत पोहोचले. तसेच सौदीचेही पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपले.

पहिल्या हाफमध्ये मेक्सिकोने जोरदार खेळ करीत वारंवार सौदीच्या गोलपोस्टवर हल्ले चढवले, पण त्यांच्या गुणफलकावर गोलचा एकही टिळा लागला नाही. त्यामुळे गोलशून्य बरोबरीतच पहिले सत्र संपले. पण दुसऱया सत्रात मेक्सिकोने कमालच केली. 47 व्या मिनिटालाच सिझर मोन्टेजने मारलेल्या कॉर्नर किकला हेन्री मार्टिनने थेट गोलजाळ्यात मारून मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पेटून उठलेल्या मेक्सिकोला लुईस चावेजने 25 यार्डवरून मारलेल्या फ्री कीकवर एक अद्भुत गोल करून दिला. यानंतर त्यांनी सौदीवर आक्रमण केले, पण कधी त्यांच्या आडवे नशीब आले, कधी रेफरी आले तर कधी सौदीचा गोली मोहम्मद अल ओवेस आला. मेक्सिकोच्या आक्रमकांनी दोन गोल ठोकले, पण रेफरींनी चक्क हे दोन्ही गोल ऑफसाईड घोषित केले. एवढेच नव्हे तर लझानो, चावेज आणि मार्टिन यांनी पुढच्या दहा मिनिटांत केलेले गोलहल्ले ओवेसने रोखले.