हारजेंटिना! सौदीची अर्जेंटिनाला अरेबियन फाइट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना सुरू होताच वाटलेलं अर्जेंटिना दुबळय़ा सौदी अरेबियाची शिकार करणार, पण प्रत्यक्षात शिकारीचीच शिकार झाली. फुटबॉलच्या जागतिक क्रमवारीत 51 व्या स्थानावर असलेल्या सौदी अरेबियाने फिफा वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात तिसऱया क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाला 2-1 ने धक्का देत खळबळ माजवली. पूर्वार्धात सामन्यावर पूर्णपणे पकड असलेल्या अर्जेंटिनाचे नशीब रुसलेलेच होते. त्यांनी तब्बल सहावेळा सौदीच्या गोलपोस्टवर आक्रमण केले, पण त्यांना केवळ एकदाच यश लाभले आणि केवळ तीनदा संधी लाभलेल्या सौदी अरबने दोन गोल ठोकून वाळवंटातल्या वादळात अर्जेंटिनालाच गाडले.

सलग 36 सामने अपराजित असलेल्या अर्जेंटिनाने गेल्याच आठवडय़ात यूएईचा 5-0 ने धुव्वा उडवला होता. आजही लुसाईल आयकॉनिक स्टेडियमवर अर्जेंटिना आपल्या लौकिकास साजेसा दणदणीत विजय नोंदवेल, अशीच अपेक्षा होती. मेस्सीच्या संघाने सुरुवातही तशीच केली. त्याने दहाव्या मिनिटालाच मिळालेल्या पेनल्टी किकवर गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाने एक-दोन नव्हे तर तीन गोल केले, पण तिन्ही गोल रेफ्रीनी ऑफसाईड घोषित केले. हे तिन्ही गोल मध्यंतरापूर्वी झाले होते. जर ते गोल ऑफसाईड नसते तर अर्जेंटिनाने 4-0 अशी आघाडी नोंदवली असती.

मध्यंतरानंतरही सामन्यावर अर्जेंटिनाची पकड दिसत होती, पण 48 व्या मिनिटाला सालेह अल-शेहरी याने अप्रतिम गोल करून सौदीला गोलांचे खाते उघडून दिले तर 53 व्या मिनिटाला सालेम अल-डावसरीने भन्नाट गोल करून सामन्यात सनसनाटी निर्माण केली. हाच गोल सौदी अरेबियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा ठरला. मग मागे पडलेल्या अर्जेंटिनाने एकामागोमाग हल्ले चढवत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण गोलरक्षक मोहम्मद अल ओवेसची भिंत अर्जेंटिनी फॉरवर्ड भेदू शकले नाहीत. त्याने चक्क तीनदा अर्जेंटिनाचे प्रयत्न हाणून पाडले.

सलग 36 सामन्यांनंतर अर्जेंटिना हरला

अर्जेंटिनाला गेल्या 36 सामन्यांत कुणी हरवू शकला नव्हता. यात त्यांनी 25 विजय मिळवले होते तर 11 सामने बरोबरीत सुटले होते. पण सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवाने ही मालिका खंडित झाली.

सौदीत आज सुट्टी

सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला 2-1 असे पराभूत केल्यानंतर सौदी अरेबियात आनंदाची लाट आली आहे. सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या संघाला पराभूत करणाया आपल्या देशाच्या फुटबॉलपटूंचे कौतुक करण्यासाठी सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ यांनी बुधवारी पूर्ण देशभर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सुट्टीची घोषणा केली.

मेस्सीचा अनोखा गोल
आपला पाचवा वर्ल्ड कप खेळत असलेल्या मेस्सीने आज सौदी अरेबियाविरुद्ध गोल करून वेगवेगळय़ा चार फिफा वर्ल्ड कपमध्ये (2006, 2014, 2018, 2022) गोल करण्याचा पराक्रम केला. याआधी चार वर्ल्ड कपमध्ये गोल ब्राझिलचे पेले, जर्मनीचे उवे सीलर, मिरोस्लाव्ह क्लोजा आणि पोर्तुगालच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांनीच केले आहेत.