FIFA World Cup 2026 – हालांदला बेलिंगहॅम भारी! नॉर्वेचा गड इंग्लंडने पाडला; आता गाठ अर्जेंटिनाशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉर्वन जगज्जेतेपदाचे स्वप्न रंगवले होते, पण ज्युड बेलिंगहॅमने ते दोन लाथांत चक्काचूर केले. अतिरिक्त वेळेत दुसरा गोल ठोकत त्याने इंग्लंडला २-१ अशा थरारक विजयासह थेट उपांत्य फेरीत नेले. अर्लिंग हालांदचा गोलांचा धडाका थांबल्याने नॉर्वेचा ऐतिहासिक प्रवासही संपला आणि आता इंग्लंडसमोर उभा ठाकला आहे गतविजेता अर्जेटिना.

 

मियामीच्या ३० अंशांहून अधिक तापमानात रंगलेल्या या लढतीत सुरुवातीला नॉर्वेने इंग्लंडला हादरवले. आपल्या पहिल्याच विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात आंद्रियास शेल्डेरूपने गोल करत इंग्लंडला धक्का दिला. पण मोठे खेळाडू मोठ्या सामन्यातच जन्माला येतात. मेक्सिकोविरुद्ध दोन गोल करणाऱ्या बेलिंगहॅमने पुन्हा एकदा संघाचा जीव वाचवला. अँथनी गॉर्डनच्या अचूक पासवर त्याने पहिला गोल झळकावत इंग्लंडला बरोबरी मिळवून दिली.

 

दुसऱ्या सत्रात नॉर्वन पुन्हा गोलपोस्ट हलवले. पण व्हीएआरने अर्लिंग हालांदने आधी इलियट अॅण्डरसनला धक्का दिल्याचे स्पष्ट करत गोल रद्द केला. हा निर्णय नॉर्वेच्या छातीत खंजीर खुपसणारा ठरला. हाच धक्का नॉर्वेला स्पर्धेबाहेर घेऊन गेला.

अतिरिक्त वेळेत पुन्हा बेलिंगहॅमच इंग्लंडचा देवदूत ठरला. मॉर्गन रॉजर्सचा फटका गोलरक्षक ऑर्जन नायलॅण्डच्या हातातून सुटला आणि टपून बसलेल्या बेलिंगहॅमने क्षणार्धात चेंडू जाळ्यात ढकलला. इंग्लंडने विजयावर आपले नाव कोरले आणि त्यानंतर मिळालेली पेनल्टीही व्हीएआरने रद्द केली, पण तोपर्यंत इंग्लंडने नॉर्वेचा कणा मोडला होता.

 

या पराभवाने अर्लिंग हालांदचा सलग १४ स्पर्धात्मक सामन्यांत गोल करण्याचा विक्रमही खंडित झाला. थकव्यामुळे अतिरिक्त वेळेच्या मध्यंतरात त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि बाकावर बसून स्वप्नांचा चुराडा पाहावा लागला. २०१८ नंतर प्रथमच इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला आहे. विशेष म्हणजे १९६६ नंतर बाद फेरीत पहिला गोल खाऊन सामना जिंकण्याचा पराक्रम त्यांनी यंदाच्या विश्वचषकात दुसऱ्यांदा केला. आता पुढचा अडथळा आहे मेस्सीचा अर्जेटिना. बेलिंगहॅमचा झंझावात की मेस्सीची जादू? याचे उत्तर आता फुटबॉलविश्व श्वास रोखून पाहणार आहे.