वर्ल्ड कप पात्रता फेरींना विलंब, फिफा प्रमुखांना चिंता

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलला मोठा धक्का बसला आहे. 14 बिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान यावेळी सोसावे लागले आहे. फिफा ही जागतिक फुटबॉल संघटना आता यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे 2022 सालामध्ये कतार येथे होत असलेल्या वर्ल्ड कपसाठीच्या पात्रता फेरीला विलंब होत आहे. यामुळे फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅण्टिनो यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास कदाचित फॉरमॅटला कात्री लावण्यात येईल.

या लढतींवर झालाय परिणाम
कोरोनामुळे नेशन्स कप, 2022 वर्ल्ड कप पात्रता फेरीसह इतर आंतरराष्ट्रीय लढतींवरही परिणाम झालेला आहे. आशियाई पात्रता फेरी, दक्षिण अमेरिकन पात्रता फेरी या स्पर्धाही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तसेच कॉनकॅकॅफ स्पर्धेच्या फॉरमॅटमध्येही बदल करण्यात आलेला आहे. कतारचे तिकीट बुक करण्यासाठी 18 सामने खेळण्याची मुभा यावेळी देण्यात आलेली आहे.

नव्या वेळापत्रकासाठी पुढाकार
आंतरराष्ट्रीय लढतींच्या नव्या वेळापत्रकासाठी फिफाकडून पाऊल उचलण्यात आले आहे. जानेवारी 2022 सालापासून आंतरराष्ट्रीय लढतींसाठी नवी जागा तयार करण्यात येणार आहे. सर्व खंडासाठी हा नियम लागू होणार आहे. तसेच कॉनॅकॅकॅफ गोल्ड कप पुढल्या वर्षी 10 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. आफ्रिका कप ऑफ नेशन्स ही स्पर्धा 2021ऐवजी 2022 सालामध्ये जानेवारी महिन्यात पार पडेल.

आपली प्रतिक्रिया द्या