
सामना प्रतिनिधी । जामखेड
सततचा पडणारा दुष्काळ दुष्काळात पाणी व चाऱ्याची भासणारी टंचाई त्यामुळे जनावरे सांभाळण्यास वीस एकर शेती असणारा शेतकरी वैतागलेला असला तरी साकत तालुका जामखेड शिवारात स्वतःची एक गुंठाही शेतजमीन नसताना हातावर पोट असणारे आजिनाथ पुलवळे मात्र 50 ते 60 देशी गाई सांभाळत आहेत. सध्याच्या चारा व पाण्याच्या तीव्र दुष्काळात हे गोधन जगविण्यासाठी सुरू असलेला संघर्ष वाखण्याजोगा आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध धंदा करतात. दूध धंदा करण्यासाठी एक दोन गायी किंवा एखादी म्हैस पाळली जाते मात्र दुधाला मिळणारा कमी भाव व नेहमीच पडणाऱ्या दुष्काळात चारा व पाण्यासाठी करावी लागणारी कसरत यामुळे शेतकरी पशुधन सांभाळण्यास धजावत नाहीत. अर्थात दूध धंद्यासाठी शेतकरी संकरित गाई पाळताना दिसतात. कारण देशी गायीच्या तुलनेत संकरित गायीचे दूध उत्पादन जास्त असते. त्यामुळे देशी गायीचा सांभाळ करण्यासाठी कोणीच धजावत नाही. त्यामुळे देशी गायीचे अस्तित्व संपण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जामखेड तालुक्यातील साकत येथील आजिनाथ विश्वनाथ पुलवळे या व्यक्तीने गेल्या पाच वर्षापासून देशी गायी सांभाळण्यास सुरुवात केली. कुटुंबाकडे कोणतीही जमीन, शेती नसतानाही पाच वर्षांच्या काळात त्यांच्याकडे लहान मोठी 60 देशी जनावरे आहेत. केवळ देशी गाई बद्दल असलेले प्रेम त्यामुळे हा गायी संभाळण्याचा व्यवसाय ते करीत आहेत. साकत शिवारात मुकुंद नेमाने यांच्या शेतात त्यांचा हा गायीचा गोठा असून गायीसाठी चारा व पाण्याची व्यवस्था व संभाळ आजिनाथ व पत्नी शोभा हे दोघे करतात. दिवसभर डोंगरात जनावरे चारतात तर चारा व पाणी आणण्यासाठी त्यांच्याकडे घोडागाडी आहे. ग्रामीण भागात हरिनाम सप्ताहच्या कार्यक्रमात चोपदार म्हणून काम करणार्या आजिनाथ पुलवळे यांना लोक महाराज या नावाने ओळखतात. अध्यात्मातून गोमातेबद्दल निर्माण झालेल्या प्रेमामुळे त्यांनी हा व्यवसाय निवडलेला असला तरी सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे जिवापाड सांभाळलेले हे गो-धन जगवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.
सध्या केंद्र सरकारने गोहत्याबंदी कायदा केलेला आहे. हिंदू धर्मात गायीला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. ग्रामीण भागात आजही गोमातेची पूजा केली जाते मात्र आजिनाथ पुलवळे यांनी देशी गायी जगवण्यासाठी सुरू केलेल्या कामाची दखल अद्याप कोणीच घेतलेली नाही. नव्हे कोणी दखल घ्यावी म्हणून ते हे पवित्र कार्य करीत नाही. भिक्षा मागुन आपली उपजिविका भागवतात व गायीच्या गोठयातच राहतात. गो-माते बद्दलच्या प्रेमामुळे ते हे काम करीत आहेत मात्र सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत चारा व पाण्याअभावी या गो-मातेची होणारी परवड थांबवण्यासाठी आजिनाथच्या संघर्षाला कोणाची तरी साथ हवी आहे.

































































