आमदार पडळकरांसह चालकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gopichand-padalkar

अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या चालकावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी सोसायटी गटातील एका मतदारावरून आटपाडी तालुक्यात दोन गटांत जोरदार वाद निर्माण झाला आहे. रविवारी दोन्ही गट समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे राजू जानकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जानकर यांनी आटपाडी पोलिसांत दाखल केली. यावरून आमदार पडळकर आणि त्यांच्या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. जानकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. आतापर्यंत दोन्ही गटांच्या 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आटपाडीच्या उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली.