दुसरी नोकरी 60 दिवसांत शोधा अन्यथा देश सोडा; H-1B व्हिसाधारक हिंदुस्थानींवर संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Meta, Amazon आणि इतर मोठ्या टेक कंपन्यांमधील सातत्याने सुरू असलेल्या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या हिंदुस्थानी व्यावसायिकांना बसत आहे. नोकरी गेल्यानंतर केवळ 60 दिवसांच्या आत नवीन नोकरी मिळवणे बंधनकारक असल्याने हजारो हिंदुस्थानींपुढे आता अमेरिकेत टिकून राहण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेले आहे.

एच-1 बी व्हिसा नियमांनुसार, नोकरी गमावलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी फक्त 60 दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत नवीन कंपनीकडून व्हिसा स्पॉन्सरशिप मिळाली नाही, तर संबंधित व्यक्तीला अमेरिका सोडावी लागू शकते. या परिस्थितीत अनेक हिंदुस्थानी कर्मचारी तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून बी-2 व्हिजिटर व्हिसासाठी अर्ज करत आहेत. या व्हिसामुळे अमेरिकेत आणखी सहा महिने राहण्याची संधी मिळू शकते. मात्र, इमिग्रेशन तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या कठोर अमेरिकन स्थलांतर धोरणांमुळे हा मार्गदेखील दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, पुराव्यांच्या नोटिसा आणि अर्ज नाकारण्याचे प्रमाण वाढल्याचं सांगितलं जात आहे. असे वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे.

गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील टेक उद्योगात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. अचानक आलेला “लेऑफ”चा ईमेल अनेक हिंदुस्थानी कुटुंबांसाठी धक्कादायक ठरत आहे. नोकरी गमावल्यावर फक्त पगारच बंद होत नाही, तर अमेरिकेत राहण्याचा अधिकारही धोक्यात येतो. घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, ग्रीन कार्डची प्रतीक्षा यामुळे अनेक जण प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

Layoffs.fyi या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत 144 टेक कंपन्यांमधील 1 लाख 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने एच-1 बी व्हिसाधारकांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये मंजूर झालेल्या 4 लाखांहून अधिक एच-1 बी अर्जांपैकी तब्बल 2.83 लाख अर्ज भारतीयांचे होते. त्यामुळे या व्हिसा व्यवस्थेवर हिंदुस्थानींचे अवलंबित्व असल्याचे स्पष्ट होते. मात्र, आता हेच अवलंबित्व त्यांच्यासाठी चिंतेचे कारण बनले आहे. अनेक हिंदुस्थानी व्यावसायिक आता कॅनडा आणि युरोपमध्ये स्थलांतराचा पर्यायही गंभीरपणे विचारात घेत आहेत. काही कर्मचारी F-1 विद्यार्थी व्हिसा, O-1 विशेष कौशल्य व्हिसा आणि L-1 कंपनी ट्रान्सफर व्हिसा यांसारख्या पर्यायांचाही शोध घेत आहेत.

दरम्यान, Meta ने AI-केंद्रित पुनर्रचनेअंतर्गत कर्मचारी कपातीची आणखी एक फेरी सुरू केली आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एआयला कंपनीच्या भविष्यातील धोरणाचा केंद्रबिंदू बनवलं असून, यासाठी कंपनीकडून अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात टेक क्षेत्रातील रोजगारावर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.