
पवईतील हिरानंदानी संकुल येथील हायको सुपरमार्केटमध्ये आज सकाळी आग लागली. मात्र सुपरमार्केट बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाने चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले तर दुपारी दीड वाजेपर्यंत आग पूर्ण आटोक्यात आली, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पवई येथील हिरानंदानी संकुल येथे पाच मजली ‘हायको सुपारमार्केट’ आहे. या सुपरमार्केटमधील पाचव्या मजल्यावरून आज सकाळी सवासहाच्या सुमाराला अचानकपणे धूर येऊ लागला. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींमध्ये घबराट पसरली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणाचे काम सुरू केले, मात्र वाऱयाच्या जोरामुळे ही आग भडकली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चार तास लागले. दुपारी दीडच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने दिली.



























































