गोरेगाव साडी सेंटरला आग;दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावमध्ये आज सकाळी साडी सेंटरला लागलेल्या आगीत दोघे जण जखमी झाले. ही आग आजूबाजूच्या गाळ्यांमध्ये पसरली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणात आणली. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नाही.

गोरेगाव पश्चिमेला आज सकाळी साडेनऊच्या सुमाराला गोरेगाव स्टेशन रोड येथील रोलिंग शॉपिंग सेंटरजवळ असलेल्या गुजरात साडी सेंटरला आग लागली. ही आग आजूबाजूच्या 7 गाळ्यांपर्यंत पसरली. मुंबई अग्निशमन दलाने 4 बंबांच्या सहाय्याने तात्काळ कार्यवाही सुरू केली. जवानांनी दुपारी साडेबारापर्यंत ही आग आटोक्यात आणली. बचावकार्य करताना यात दोघे स्थानिक जखमी झाले. यातील अनिल कुमार (30) यांच्या पाठीला मार लागला असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अमृत गायकवाड (40) यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख हेमंत परब यांनी दिली.