…तर गोव्यातील एकही वाहन सिंधुदुर्गात येवू देणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासळी केमिकलयुक्त नसून ताजी व प्रोटिनयुक्त आहे, असे असताना गोवा सरकारने सिंधुदुर्गातील मासळी वाहनांवर आणलेली बंदी नियमबाह्य आहे. तरी गोवा सरकारने घातलेल्या बंदीबाबत पुनर्विचार करून शिथिलता न आणल्यास गोव्यातील एकही वाहन सिंधुदुर्गात येवू देणार नाही. तसेच गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या मासळीलाही थारा देणार नाही. असा आक्रमक पवित्रा सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसाईक, मासळी वाहन चालक व मच्छिमार प्रतिनिधींनी घेतला आहे. गोवा येथून मालवणात मासे खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनाही सिंधुदुर्गातून मासळी दिली जाणार नसल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

गेल्या 10 दिवसांपासून सिंधुदुर्गातुन गोवा राज्यात मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहे. इन्सुलेटेड वाहनसक्ती, अन्न व औषध प्रशासन प्रमाणपत्र अशा जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. मासळी वाहतूक ठप्प झाल्याने मासळी व्यवसाय ठप्प होऊन लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. याबाबत कोणताही तोडगा निघत नसून गोवा सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमार नेते हरी खोबरेकर यांच्या पुढाकारातून मालवण येथे सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसाईक, मासळी वाहतूक वाहन चालक, मच्छिमार सोसायटी प्रतिनिधी, मच्छिमार व महिला मत्स्य व्यवसाईक यांची बैठक मालवण शहरातील दैवज्ञ भवन सभागृहात झाली. यावेळी मालवण, देवगड व वेंगुर्ला येथील 200 हुन अधिक मत्स्य व्यवसाईक व मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते.

गेली काही वर्षे गोवा सरकारकडून सातत्याने सिंधुदुर्गातील मासळीवर निर्बंध घातले जात असून मच्छीमारांवर अन्याय केला जात आहे. हा अन्याय होत असताना महाराष्ट्र सरकारकडून मध्यस्थी अथवा ठोस तोडग्यासाठी कार्यवाही होत नाही. याबाबतही उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. तर सिंधुदुर्गात होलसेल मासळी केंद्र उभारावे, मासळी साठवणूक केंद्र व्हावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मालवण मच्छी मार्केट ठेकेदाराने मासळी मार्केटमध्ये केमिकल मिश्रित मासळीची विक्री केली जात असल्याचा आरोप केला होता. याचे तीव्र पडसादही मच्छीमारांच्या बैठकीत उमटले. त्या ठेकेदारांच्या आरोपामुळे मच्छीविक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रत्यक्षात येथील मासळीवर कोणतेही केमिकल वापरले जात नाही. येथील मासळी ही ताजीच असते. मात्र त्या ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या आरोपामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आला आहे. मार्केट ठेकेदाराने खोटे आरोप करू नयेत अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा महिला मच्छीमार विक्रेत्यांनी दिला. यावेळी त्या ठेकेदाराचा तीव्र निषेध करत मासळी मार्केटमध्ये पाय ठेऊ देणार नाही असा इशारा मच्छीमारांनी दिला.

सिंधुदुर्गात मासे विक्री बंद ठेवत गोवा सरकारचा निषेध
गोवा सरकारच्या सिंधुदुर्गातील मासळी बंदी कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला. तर गोवा येथील जे व्यापारी सिंधुदुर्गातील मत्स्य व्यापारी व मच्छिमारांना पाठिंबा देत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवार 5 तारखेला सिंधुदुर्गात मासे विक्री बंद ठेवली जाणार आहे, अशी भूमिका हरी खोबरेकर व उपस्थितांनी घेतली.