माशांमुळे डास वाढले, आरोग्य अधिकाऱ्याचा नवा शोध; नवी मुंबई स्थायी समितीत बोंबाबोंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

थंडीचा कडाका वाढू लागताच शहरात मच्छरांचीं भुणभुण वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र याला डबकी किंवा नाले कारणीभूत नाहीत तर चक्क मासे जबाबदार असल्याचा जावईशोध नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य अधिकाऱयाने लावला आहे. शहर परिसरात होत असलेल्या मत्स्यशेतीमुळे नवी मुंबईत डास वाढले असल्याचा अजब खुलासा या आरोग्य अधिकाऱ्याने स्थायी समितीत केला. त्यामुळे प्रशासनावर जबरदस्त टीका करत सदस्यांनी एकच बोंबाबोंब केली.

वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात काम करणाऱया मुख्य वैद्यकीय अधिकाऱयांची नावे न सांगू शकणारे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके स्थायी समितीच्या सभागृहात दुसऱ्यांदा उघडे पडले. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याबाबत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची कटके यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. उलट त्यांनी डासवाढीचे खापर थेट मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर फोडले.

मस्यशेती करण्यासाठी तळे बनवून मोठय़ा प्रमाणात पाणी साठवले जाते. यामध्ये डासांची पैदास होत असल्याने शहरात मच्छर वाढले असल्याचा शोध त्यांनी लावला आहे. आरोग्य विभागाच्या या बेजबाबदार कारभारावर जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, शिवसेनेचे नामदेव भगत, शिवराम पाटील, राष्ट्रवादीचे डॉ. जयाजी नाथ यांनी तीक्र नाराजी व्यक्त केली. सभागृहाने विचारलेली माहिती डॉ. कटके यांना सांगता आली नाही, त्यामुळे सभापती सुरेश कुलकर्णी यांच्यासह नगरसेवकांनी प्रशासनाला जोरदार धारेवर धरले.

फवारणीत संशयाचा धूर
नवी मुंबई महापालिकेकडून होत असलेल्या धूर फवारणीबाबतही नगरसेवकांनी संशय व्यक्त केला. धूर फवारणीचा ठेका संपला असून गेल्या तीन वर्षांपासून प्रशासन नवीन निविदा काढण्याचे काम करत आहे. एका ठरावीक ठेकेदाराला हे काम मिळावे यासाठी सहा वेळा अटी आणि शर्ती बदलण्यात आल्या आहेत, असा आरोप यावेळी सभागृहाने केला.