सुट्टीहून परतणाऱ्या जयसिंगपूरातील शिरोटे कुटुंबावर काळाचा घाला; वाळव्यातील अपघातात पाच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येवलेवाडी फाटा येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. पुणे येथून सुट्टी संपवून जयसिंगपूरला परतणाऱया शिरोटे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

अरिंजय अण्णासाहेब शिरोटे (वय 38, सध्या रा. वाकड, पुणे, मूळ रा. जयसिंगपूर), स्मिता अभिनंदन शिरोटे (वय 35), पूर्वा अभिनंदन शिरोटे (वय 14), सुनेषा अभिनंदन शिरोटे (वय 10), वीरेन अभिनंदन शिरोटे (वय 5, सर्व रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) अशी मृतांची नावे आहेत. अरिंजय शिरोटे हे शनिवारी सकाळी कुटुंबीयांसह पुण्याहून कारमधून जयसिंगपूरला निघाले होते. दुपारी कराडच्या मागे शिरोटे कुटुंबीयांनी भोजन केले. तेथून जयसिंगपूरच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, येवलेवाडी फाटा येथे कंटेनरचालक कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करून लघुशंकेसाठी गेला होता. त्याच वेळी पुण्याहून जयसिंगपूरला निघालेल्या शिरोटे यांच्या कारने रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अरिंजय शिरोटे, स्मिता शिरोटे, पूर्वा शिरोटे, सुनेषा शिरोटे, वीरेन शिरोटे हे जागीच ठार झाले. माहिती मिळताच कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

‘तो’ फोन ठरला शेवटचा

अरिंजय शिरोटे हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस असून, पुण्यात वाकड येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे मूळ गाव जयसिंगपूर आहे. अरिंजय शिरोटे यांच्या पुणे येथील घरी त्यांच्या भावजय स्मिता, पुतणे पूर्वा, सुनेषा व वीरेन हे सुट्टीसाठी गेले होते. आज अरिंजय हे त्यांना पुणे येथून जयसिंगपूरला सोडण्यासाठी कारने सकाळी निघाले. दुपारी दोनच्या सुमारास अरिंजय यांनी वडील अण्णासाहेब शिरोटे यांना फोन करून ‘आम्ही कराडमध्ये आलो असून, दीड तासात जयसिंगपूरला पोहोचतो,’ असा फोन केला होता. त्यांचे हे संभाषण शेवटचे ठरले.