जम्मूत 12 तासांत पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा; जैश कमांडर जाहीद वाणी ठार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा आणि बडगाव येथे गेल्या 12 तासांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. यात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहीद वाणी याचाही समावेश आहे. सुरक्षा दलासाठी हे मोठे यश आहे, अशी माहिती कश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली.

कश्मीरच्या पुलवामा आणि बडगाव जिह्यात सुरक्षा दलांबरोबर दोन वेगवेगळ्या ठिकाणी या चममकी झाल्या. ठार झालेले पाचही जण लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी होते. यात जैश कमांडर जाहीद वाणी याचा समावेश आहे. पुलवामात 4 तर बडगावमध्ये एक जण ठार झाला. सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात एके-56 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवडय़ात शोपियानमध्ये झालेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते.

11 चकमकी, 21 दहशतवादी ठार 

2022 वर्षात आतापर्यंत 11 चकमकी झाल्या असून यात 21 दहशतवादी ठार झाले. यातील 8 दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत. महिनाभर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना मोठा झटका बसला असून संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे कश्मीर खोऱयात शांतता निर्माण होऊन विकासाला चालना मिळेल, असे विजय कुमार यांनी म्हटले आहे.