सीएसएमटीत मेल-एक्प्रेसच्या प्रवाशांनाही ‘क्यूआर कोड’द्वारे प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लांबपल्ल्याच्या गाडय़ांना पकडण्यास येणाऱया प्रवाशांना मेट्रोप्रमाणे फ्लॅप गेटने तिकीटासह ‘क्यूआर’ कोड तपासूनच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी फ्लॅप गेटच्या स्कॅनरवर प्रवाशांना ‘क्यूआर’ कोड स्कॅन करावा लागणार असून तेथेच त्यांचे थर्मल स्कॅनिंगही एकाच वेळी करण्याची यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.

सध्या उपनगरीय लोकलच्या मोजक्याच फेऱया अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी चालविल्या जात आहेत. या प्रवाशांना राज्य सरकारने ‘क्यूआर’ कोड जारी केले आहेत. तसेच त्यांना तिकीट आणि पास खरेदी करण्यासाठी अतिरिक्त खिडक्याही उघडल्या आहेत. अधिकृत तिकीट आणि ‘क्यूआर’कोड पाहूनच स्थानकात प्रवेश दिला जात आहे. आता लांबपल्ल्यांच्या गाडय़ांसाठी देखील प्रवाशांना प्रवेश देताना  ‘क्यूआर’ कोड पाहूनच सीएसएमटीत प्रवेश देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर आणि पीआरएस काऊंटरवर मेल आणि एक्प्रेसचे तिकीट काढताना ‘क्यूआर’ कोड आपोआप जारी केला जात आहे. या क्यूआर कोडमध्ये तिकीटांचा सारा तपशील जतन केलेला असतो.

प्रवाशांकडून 10 ते 35 रुपये युजर चार्जेस

रेल्वे स्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर पुनर्विकास करताना प्रवाशांना देण्यात येणाऱया सोयी -सुविधांच्या बदल्यात तिकीटांवर अतिरिक्त युजर चार्जेस म्हणून 10 ते 35 रूपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येऊ शकते असे रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे. प्रवाशांना देण्यात येणाऱया लक्झरी सोयी सुविधांच्या मोबदल्यात 10 ते 35 रूपये युजर चार्जेस आकारण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. तो केबिनेट पुढे अंतिम मंजूरीकरीता पाठविला जाणार आहे. एसी फर्स्टक्लासच्या प्रवाशांकडून कमाल 35 रूपयांपर्यंत चार्ज आकारला जाईल, असे सूत्रांनी म्हटले.सध्या उपनगरीय लोकलच्या मोजक्याच फेऱया अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी चालविल्या जात आहेत. या प्रवाशांना राज्य सरकारने ‘क्यूआर’ कोड जारी केले आहेत.