
सामना प्रतिनिधी । जामखेड
कलाकेंद्र बंदच्या आदेशानंतर गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले कलाकेंद्र चालक व कलावंतांचे बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी कलावंतांच्या मागण्या जिल्हा प्रशासनाला कळविण्याच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. दहा दिवसात जर जिल्हा प्रशासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय व पालकमंत्र्यांच्या घरासमोर आमची कला सादर करून तीव्र आंदोलन करत जामखेडमध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही, असा इशारा कलावंताच्या वतीने अरुण जाधव यांनी दिला आहे.
गेल्या सहा दिवसांपासून कलाकेंद्र चालक व कलावंतांचे बेमुदत उपोषण सुरू होते. त्यात रवी कांबळे, राहुल राळेभात, संतोष काळे, मंगल जाधव, संजीवनी जाधव यांची प्रवृत्ती खालावली होती. त्यांना जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. उपोषण सोडतेवेळी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, अॅड. हर्षल डोके, एम. पाटील, अमोल लोखंडे, गुलशन अंधारे, अरूण जाधव, बापुसाहेब गायकवाड, सर्फराज शेख यांच्यासह सर्व कलाकार उपस्थित होते. यावेळी अरूण जाधव म्हणाले की, जर दहा दिवसात जिल्हा प्रशासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कलाकारांना घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय व पालकमंत्र्यांच्या घरासमोर एकाच दिवशी आमची कला सादर करून तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
कायदा सुव्यवस्था फक्त मोहा हद्दीतील कला केंद्रानांच लागू होते. इतर कलाकेंद्रानां नाही का, असा प्रश्न स्वराज कलाकेंद्राचे मालक एम. पाटील यांनी करत प्रशासनावर आरोप केला. 22 फेब्रुवारी रोजी कलाकेंद्राना लायसन्स कसे दिले आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आणि कोणताही अहवाल प्रशासनास कसा मिळाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांनी परवानगी रद्द केल्याचा आरोपही त्यांनी केला.



























































