
राजेश चुरी । मुंबई
अतिरेकी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन मंत्रालयावर चार ड्रोन कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जाणार आहे. या चार ड्रोन कॅमेऱ्यांमधून मंत्रालयाच्या सर्व मजल्यांपासून नवीन प्रशासकीय इमारतींवर बाहेरून लक्ष ठेवता येईल.मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत गेल्या काही वर्षांपासून वाढ करण्यात आली आहे. अतिरेकी कारवायांचा धोका वाढत आहे. मध्यंतरी काही दहशतवाद्यांनी मंत्रालयाची रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
मनुष्यबळाची कमतरता व सुरक्षा मर्यादा लक्षात घेऊन मंत्रालयात येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे ४२० कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून चार ड्रोन कॅमेरे घेतले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण मंत्रालयावर नजर ठेवण्यात येईल. या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे मंत्रालयाच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येईल. कोणत्याही मजल्याच्या खिडकीच्या बाहेरून मंत्रालयाच्या केबीनमधील हालचालीही टिपता येतील. वेळ पडल्यास ड्रोन कॅमेरे मंत्रालयाच्या कोणत्याही दरवाजातून थेट कोणत्याही दालनापर्यंत पोहोचून आतील परिस्थितीचा आढावा घेतील. राज्यात आतापर्यंत कोणत्याही सरकारी कार्यालयाला असे आधुनिक सुरक्षा कवच दिलेले नाही.
– ड्रोनवर अत्याधुनिक कॅमेरे
– नाईट व्हिजन कॅमेऱ्यांचा समावेश
– काळोखातील हालचालीही टिपणार
– दरवाजातून घुसून थेट दालनापर्यंत घुसण्याची ड्रोनची क्षमता
– चार पोलिसांना देणार ड्रोनवरील नियंत्रणाचे प्रशिक्षण
मोटारींचे नंबर स्कॅन
सुरक्षा व्यवस्थेच्या दुसऱ्या टप्प्यात मंत्रालयाच्या प्रत्येक गेटवर लोखंडी अडथळे उभारण्यात येणार आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर ज्याप्रमाणे लोखंडी ओंडक्यांचा अडथळे उभारले आहेत, लष्कराच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था असते. कोणतेही वाहन थेट मंत्रालयात घुसवण्याचा प्रयत्न केला तर या लोखंडी अडथळ्याला सर्वप्रथम थडकेल. मंत्रालयात येणाऱया प्रत्येक वाहनाच्या क्रमांकाचे स्कॅनिंग होईल. स्कॅनिंगचा क्रमांक जुळला तर लोखंडी अडथळे जमिनीत जातील, मगच वाहन मंत्रालयात प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था आहे.
कॅमेऱ्यांच्या जोडीला ड्रोन कॅमेऱ्यांची जोड
देशातील वाढत्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. त्यामध्ये मंत्रालयाचा समावेश आहे. मंत्रालयातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ४२० कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱयांना चार ड्रोन कॅमेऱ्यांची जोड दिली आहे.
पर्यायी सर्व्हर
मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित माहिती कोणत्याही आपत्कालीन वेळी सुरक्षित राहावी म्हणून ही सर्व माहिती एका पर्यायी सर्व्हरवर ठेवण्यात आली आहे.



























































