शिरुरच्या सविंदणेत जबरी चोरी, चोरट्यांच्या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील सविंदणे च्या पूर्व नरवडे मळ्यात आज पहाटे दोनच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. कवठे रोड नजीकच्या ओढ्या पलीकडे राहणाऱ्या संभाजी नरवडे यांच्या घराचा दरवाजा ऊचकटून संभाजी नरवडे (67) व त्यांच्या पत्नी बबूबाई नरवडे (60) यांना जबर मारहाण केली. तसेच बबूबाई यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र, मोहन माळ ,जोडवी, कानातील कर्णफुले,व मोबाईल असा अंदाजे दहा तोळयाचा ऐवज लंपास केला आहे.चोरटयांनी त्यांच्या घरातील सामानाची उलथापालथ करून घरातील तीन हजार रोख रक्कम घेऊन चोरटे तेथून पसार झाले. नरवडे दाम्पत्याच्या घराजवळ कुठलेही घर नाही. ते दोघेच घरामध्ये राहत होते. मुलगा बाहेरगावी नोकरीसाठी वास्तव्यास आहे.अचानक घडलेल्या या घटनेमुळे हे वृद्ध पती पत्नी अत्यंत भयभीत झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे,पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले व पोलीस कर्मचारी तात्काळ रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार कवठे रस्त्यालगत राहणारे मोहन नरवडे यांच्या घरच्या मागील दोन खिडक्या काढून घरात शिरण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला पण तो अयशस्वी झाला. तर नजीकच्या संजय नरवडे यांची दुचाकी चोरटे घेऊन पसार झाले. मात्र चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत संभाजी नानाभाऊ नरवडे, बबुबाई संभाजी नरवडे हे दोघे ही गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीकांनी त्यांना सह्याद्री हॉस्पीटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे गाव व परिसरातील नागरीक भयभीत झाले असून सविंदणे गावच्या परिसरात विद्युत रोहित्र, विद्युत मोटारी चोरीचे सत्र सुरूच असून आता घरफोड्या सुरू झाल्या असल्याने पोलीस प्रशासनाने याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे..तर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मिळाल्यानंतर पोलीस उप निरीक्षक अभिजित सावंत व त्यांचे पथक घटनेच्या तपासकामी सकाळी सहालाच घटनास्थळी दाखल झाले.तपासास सुरुवात करून परिसर पिंजून काढला.यावेळी श्वानपथक ही दाखल झाले होते. ही घटना गंभीर स्वरूपाची असून या घटनेचा लवकरात लवकर छडा लावू व यातील आरोपी गाजाआड़ करू असा विश्वास शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी दिला आहे.