फेसपॅक विसरा आता करा लेगपॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्याची आवश्यकता असते. यासाठी काही जण विशिष्ट प्रकारची फळे किंवा फूड सप्लिमेंटचे सेवन करतात. शिवाय तऱ्हेतऱ्हेच्या फेसपॅकचा वापर करतात. मात्र आता एका विशिष्ट प्रकारच्या फूट मास्कचा वापर करून तुम्ही तुमच्या सौंदर्यात वाढ करू शकता. या मास्कमुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. यामुळे त्वचा उजळ, मुलायम आणि चमकदार होते. पायांना दुर्गंध येण्याची समस्या असलेल्यांसाठीही हा फूस्ट मास्क (लेग पॅक) अत्यंत फायदेशीर आहे.

पायांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढावे याकरिता पायाच्या तळव्यांना मड पॅक लावला जातो. मड म्हणजे विशिष्ट प्रकारची माती. वाहत्या पाण्याच्या जलाशयाच्या तळाशी असलेली माती शुद्ध करून लेग पॅकसाठी वापरतात. जलाशयाच्या तळाशी खोलवर असलेल्या या मातीत नैसर्गिक खनिजे आणि औषधी गुणधर्म असतात. यामुळे ही माती त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असते.

मड पॅकमुळे पायांवरील मृत त्वचेचा थर निघून जातो आणि ते मऊ, गुळगुळीत होतात. पायांची त्वचा उजळ होते. ज्यामुळे पाय खूप सुंदर दिसतात. याकरिता पाय स्वच्छ धुवून कोरडे करून हा पॅक 30 मिनिटे लावायचा. मड फेस पॅकचा वापर फूट मास्क म्हणूनही करता येतो तसेच बाजारात मड फूट मास्क मिळतो किंवा या मास्कऐवजी मुलतानी मातीही पायांच्या तळव्यांना लावल्यास पाय स्वच्छ होऊन डोकं शांत ठेवण्यास मदत करते.

मानसिक शांततेकरिता…
जर तुम्हाला मड पॅक किंवा मुलतानी मातीचा वापर करायचा नसेल, तर शीट मास्कचाही उपयोग करू शकता. शीट मास्कमुळे विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. पायांचे सौंदर्य वाढते आणि दुर्गंध दूर होण्यास मदत होते. शारीरिक थंडावा आणि मानसिक शांततेतकरिता मड फूट मास्क आणि मुलतानी मातीचा फूट मास्क जास्त प्रभावी आहे.

पुरुषांकरिता अत्यंत फायदेशीर…
पायांच्या दुर्गंधीचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरच होतो असे नाही, तर काही वेळा समाजात वावरतानाही याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ज्या पुरुषांच्या पायांना अत्यंत दुर्गंध येतो, त्यांच्याकरिता फूट मास्क अत्यंत फायदेशीर आहे. घामामुळे पायांना दुर्गंधी येते. पायांतील ओलावा टिकून राहिल्यामुळे तेथे विषाणुंची वाढ होण्याची शक्यता असते. ही समस्या असलेल्या पुरुषांनी आठवड्यातून 2 ते 3 वेळा फूट मास्क पायांना लावावा. यामुळे पायांना अतिघाम येण्याची समस्या कमी व्हायला मदत होते तसेच स्वत:लाही ताजेतवाने वाटते.