
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्यावर भाषण करत असताना शुक्रवारी सकाळी गोळीबार झाला होता. या गोळीबारात ते गंभीरीत्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दुपारी त्यांना मृत घोषीत केले. माजी पंतप्रधानांच्या या हत्येमुळे जपान हादरून गेले आहे. पश्चिम जपानमधील नारा शहरात प्रचार करत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला.
आबे यांची हत्या करणाऱ्या तेत्सुया यामागामी (41 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. आबे हे लिबरल डेमोक्रॅटीक पार्टीच्या (उदारमतवादी लोकशाही पक्ष) उमेदवाराचा प्रचार करत होते. प्रचारादरम्यान ते एका रस्त्यावर उभे राहून भाषण करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. जपानमधील नारा शहरातील यामातोसाईदाजी स्थानकाजवळ ही घटना घडली. गोळी लागून शिंझो आबे रस्त्यावर कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ माजली होती. गोळी लागल्यानंतर आबे हे अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आबे यांची हत्या झाल्याबद्दल हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून उद्या हिंदुस्थानात राष्ट्रीय दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.




























































