
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील (81) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस ते हृदयविकाराच्या त्रासाने आजारी होते. कुपवाड येथील जैन स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
समाजवादी विचारांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रा. शरद पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून 1990 आणि 1995 साली विजय मिळवला होता. भाजपचा गड समजला जाणाऱया पुणे पदवीधर मतदारसंघातून 2002 साली दिग्गज आमदार प्रकाश जावडेकर यांचा धक्कादायक पराभव करून विधान परिषदेची निवडणूक जिंकली होती.



























































