रिक्षात हातचलाखी करून केली फसवणूक, अंधेरी पोलिसांनी ठोकल्या चौकडीला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रिक्षात हातचलाखी करून प्रवाशाच्या बॅगेतून पैसे काढल्याप्रकरणी चारजणांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद साबीर इस्माईल मलिक, अफजल अली हसन शेख, निजामुद्दीन मोहम्मद अकबर मलिक आणि नईम सईद मलिक अशी या चौघांची नावे आहेत. ते चौघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
तक्रारदार हे वडाळा येथे राहतात. ते अंधेरी येथे कामाला आहेत.

शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे कामाकरिता अंधेरी येथे आले. ते एका रिक्षातून प्रवास करत होते तेव्हा त्या रिक्षात अगोदरच दोघेजण बसले होते. काही अंतर गेल्यावर रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली तेव्हा एकजण रिक्षात बसला. रिक्षा लोड घेत नाही असे सांगून एकाला तक्रारदारांच्या मांडीवर बसवले. त्याचदरम्यान हातचलाखी करून तक्रारदाराच्या बॅगेतून 35 हजार रुपये काढण्यात आले. प्रवासादरम्यान काही पैसे खिशात असावे म्हणून त्यांनी बॅग पाहिली तेव्हा त्यांच्या बॅगेत पैसे नव्हते.

फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी अंधेरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या चौघांना अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. फसवणूक झालेली रक्कम पोलिसांनी अद्याप जप्त केलेली नाही. पोलीस त्या चौघांची कसून चौकशी करत आहेत.