बालकांची खरेदी-विक्री प्रकरण, विशाखापट्टणम येथून आणखी चार महिलांना अटक

नवजात बालकांच्या खरेदी-विक्री प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी चार महिलांना विशाखापट्टणम येथून अटक केली. शिवाय आज आणखी एका महिलेला तेथूनच ताब्यात घेतले असून आणखी दोन बालकांची सुटका केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणात 14 जणांना अटक केली असून चार बालकांची सुटका केली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दोन दिवसांपुर्वी नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश केला होता. अंमलबजावणी शाखेच्या उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धडक कारवाई करत एका डाँक्टरसह सहा दलालांना पकडून दोन बालकांची सुटका केली होती. दरम्यान, पोलिसांनी आणखी खोलात जाऊन तपास करत सोमवारी तीन महिलांना अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे विशाखापट्टणम येथून आणखी चार महिलांना अटक करण्यात आली. त्या चौघींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या दलाल महिलांव्यतिरिक्त पोलिसांनी आज आणखी एका महिलेला विशाखापट्टणम येथून ताब्यात घेतले. याशिवाय दलाल महिलांनी विकलेल्या दोन बालकांची सुटका केली. एका आठ महिन्यांच्या मुलीची हैदराबाद तर दिड वर्षांच्या मुलाची नगर जिल्ह्यातून सुटका केली आहे.

उपायुक्त रागसुधा व त्यांच्या पथकाने आता पर्यंत नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या रँकेटचे कंबरडे मोडत 14 जणांना अटक करून चार बालकांची सुटका केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अटक केलेल्यांमध्ये काही फर्टिलिटी एजंट तर काही एग्ज डोनर आहेत.