
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
वीज खांबाला कार धडकून झालेल्या अपघाताची पोलीस दप्तरी नोंद केली नाही. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत अपघातग्रस्त कार मधील मालवण येथील चारही पोलिसांची बदली सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालयात तडकाफडकी करण्यात आली आहे. तसेच त्या घटनेची चौकशी करण्यासाठी निवासी पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.
मालवणला जात असताना रविवारी रात्री पोलिस कर्मचाऱ्यांची कार मालवण भरड येथे वीज खांबाला धडकून अपघात झाला होती. परंतु या अपघाताची नोंद न केल्यामूळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. बऱ्याच गुन्ह्यांमध्ये फिर्यादी कोणी नसला तर स्वतः पोलीस फिर्यादी बनतात व वीज खांबाला कार अपघात होऊन सुद्धा पोलिसांनी फिर्याद दिली नाही. तेथील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही हा अपघात दडपण्याचा प्रयत्न करत पोलीस ठाण्यात नोंदच नाही तर चौकशी करण्याचा प्रश्न नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पोलिसांच्या भेदभावाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होत होती. तशा प्रकारचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना विचारले असता पोलिसांच्या अपघातग्रस्त कारच्या घटनेची दखल घेण्यात आली असून अपघात होऊनही पोलीस दप्तरी नोंद न केल्याने पोलीस कर्मचारी आशिष भाबल, विवेक नागरगोजे, विल्सन डोसिजा, निलेश सोणवणे या चार पोलिसांची मालवण येथून सिंधुदुर्गनगरी येथे पोलीस मुख्यालयामध्ये तडकाफडकी बदली करून निवासी पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवाला नंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही गेडाम यांनी यावेळी स्पष्ट केले.



























































