घर खरेदी करताना बिल्डरांकडून होणारी फसवणूक थांबणार; महारेराकडून मार्गदर्शक सूचना जारी

बहुतेकजण आयुष्यभराची कमाई पणास लावून घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करीत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये म्हणून महारेराने अशा घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी पाच मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.

घर खरेदी करण्यापूर्वी प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे ना? महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे ना? घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे ना? तुम्ही 10 टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी, घर नोंदणी करीत असल्यास विकासक घर विक्री करार करतोय ना? आणि ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत ना? या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी. प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असेल तर विकासकांना रेरा कायद्यानुसार ग्राहक हिताच्या दृष्टीने अनेक अटींची पूर्तता करावी लागते. विकासकाकडे घर खरेदी, घर नोंदणीपोटी आलेली रक्कम इतरत्र खर्च न होता त्याच प्रकल्पावर खर्च व्हावी यासाठी रेरा नोंदणी क्रमांकनिहाय बँकेत खाते उघडावे लागते. त्या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशांपैकी 70 टक्के रक्कम या प्रकल्पाच्या कामासाठी या खात्यात ठेवावी लागते. विकासकाला हे पैसे केव्हाही काढता येत नाहीत.

याशिवाय 1 जानेवारीपासून महारेराने नवीन प्रकल्पाच्या नोंदणीसाठी विकासकासोबतच्या सर्व संचालकांचा दिन क्रमांक (DIN ) याच्यासह या सर्वांच्या इतरही प्रकल्पाची सविस्तर माहिती या नवीन प्रकल्पाची नोंदणी करताना नोंदवणे आता बंधनकारक आहे. महारेराने ठरवून दिलेल्या या सर्व बाबींची काळजी घेऊन गुंतवणूक केल्यास ती गुंतवणूक सुरक्षित राहायला नक्की मदत होणार आहे.

महारेरा नोंदणीकृत प्रकल्पाची वैशिष्टय़े

प्रकल्पाची सविस्तर माहिती महारेरा संकेतस्थळावर उपलब्ध असल्याने पारदर्शता वाढते, प्रकल्पाचा प्रगती अहवाल दर तीन महिन्याला महारेराच्या संकेतस्थळावर नोंदवणे विकासकाला बंधनकारक, प्रकल्पात मोठी वाढ किंवा फेरफार करण्यासाठी 2/3 घर खरेदीदारांची संमती आवश्यक, प्रकल्पासंबंधी तक्रार असल्यास महारेराकडे दाद मागण्याची सोय, महारेराच्या संकेतस्थळामार्फत घरबसल्या प्रकल्पाचे संनियंत्रण शक्य.