एका चुकीच्या क्लिकमुळे किंवा दुसऱ्याच्या वाय-फायद्वारे आर्थिक व्यवहार केल्याने तुमच्या आयुष्यभराच्या कमाईवर दरोडा पडू शकतो. त्यामुळे सतर्कता बाळगणे सध्याच्या काळात अत्यंत गरजेचे झाले आहे. ऑनलाईन पेमेंटमुळे व्यवहार अत्यंत सोपे झाले असले तरी हे तंत्रज्ञान अनेकदा धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन सायबर विभागातर्फे करण्यात आले आहे. कोणत्याही ई-मेलला त्वरित प्रतिसाद देऊ नको. थोडा वेळ घ्या, पडताळणी घ्या अशी सूचनाही करण्यात आली आहे.
दीपेश नावाच्या तरुणाने गॅझेट खरेदी करण्यासाठी ऑनलाईन लिंकवर क्लिक केले. 50 टक्के सवलतीची ऑफर दिसत होती. त्यामुळे त्याने ऑर्डर दिली आणि तो फसवणुकीचा बळी ठरला. कोणत्याही लिंकच्या मदतीने अॅप्स डाऊनलोड करू नका. रेल्वे स्टेशन, हॉटेल लाऊंज किंवा विमानतळावर मोफत वाय-फाय वापरू नका. सार्वजनिक हॉटस्पॉटवरून व्यवहार करू नका. डेबिट किंवा व्रेडिट कार्ड वापरताना सावधगिरी बाळगा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
फसवणूक झाल्यास काय कराल?
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास ताबडतोब बँकेला कळवा. जर तुम्ही सायबर गुह्याचे बळी ठरलात तर ताबडतोब पोलीस किंवा सायबर क्राइम सेलशी संपर्क साधा. 1930 वर कॉल करून तक्रार नोंदवा किंवा www.cybercrime.gov.in ला भेट द्या, अशा सूचनाही सायबर सेलकडून करण्यात आल्या आहेत.