अॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे पाऊल पडते पुढे

अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅममध्ये डॉमिनिक थीमकडून पाच सेटमध्ये पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱया जर्मनीच्या अॅलेक्झॅण्डर झ्वेरेवने फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमध्ये दमदार सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीच्या लढतीत डेनिस नोवाकला 7-5, 6-2, 6-4 अशा फरकाने पराभूत केले आणि पुरुष एकेरीत पुढे पाऊल टाकले. युवा शिलेदाराने ही लढत दोन तास पाच मिनिटांमध्ये जिंकली हे विशेष.

पाच सेटचा थरार

या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुरुष एकेरीत टेनिसपटूंमधील कमालीचे द्वंद्व पाहायला मिळाले. तब्बल चार लढतींचा निकाल पाच सेटनंतर लागला. यामध्ये जुआन लोंदेरो-फेदरीको डेलबोनीस यांच्यामधील लढत चार तास 54 मिनिटे रंगली. या लढतीत जुआन लोंदेरो याने 6-4, 7-6, 2-6, 1-6, 14-12 अशी बाजी मारली. फ्रेंच ओपनमध्ये इतर ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांप्रमाणे अखेरच्या सेटमध्ये टायब्रेकरचा अवलंब करण्यात येत नाही.

मरेचा खेळ खल्लास

स्टॅन वावरिंका व ऍण्डी मरे यांच्यामधील पुरुष एकेरीच्या लढतींवर साऱयांच्या नजरा खिळल्या होत्या. पण हा फुसका बार निघाला. स्टॅन वावरिंका याने ही लढत 6-1, 6-3, 6-2 अशा सरळ तीन सेटमध्ये जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अॅण्डी मरेचा खेळ मात्र सलामीलाच खल्लास झाला.

आपली प्रतिक्रिया द्या