
मोक्काच्या गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वारजे पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
नकुल शाम खाडे (रा. नवी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खाडे यांच्यावर जिवे मारण्याच्या प्रयत्नासह आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून खाडे हा पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी वारजे पोलिसांनी मागील तीन महिन्यांपासून त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. परंतु खाडे मिळून येत नव्हता. दरम्यान खाडे हा चांदणी चौक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून खाडेला अटक केली. सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मीणी गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, हवालदार रामदास गोणते, पोलीस नाईक प्रदीप शेलार, अमोल राऊत, गोविंद फड, हनमंत मासाळ, बंटी मोरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.


























































