आरोग्य सुविधांसह इतर विकासात्मक कामांना निधी कमी पडणार नाही – मंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली जिल्हयात सद्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे चांगले कार्य सुरू असून इतर विकास कामेही प्रगथीपथावर आहेत. यावेळी आरोग्य सुविधांसह इतर सर्वच विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकित उपस्थितांना दिले. पालकमंत्री यांनी आज जिल्हयात विविध विषयांचा आढावा बैठकीत घेतला. यामध्ये कोरोना, आरोग्य सुविधा, धान खरेदी व साठवणूक, शेती सलग्न विषय, वीज समस्या व नियोजन मधील कामांची सद्यस्थिती यांचा समावेश होता. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदर कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, नगराध्यक्षा योगिता पिपरे व तालुका तसेच जिल्हा स्तरावरून सर्व विभाग प्रमुख ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते.

बैठकीआधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे, त्याचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या इतर सुधारणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यापुर्वी नुकतेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा, आयसीयू कक्ष यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तसेच यापुर्वी तालुकास्तरावर सोनाग्राफी सुरू करण्यात आली आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन स्वरूपात विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला व विकास कामांबाबत विभाग प्रमुखांना सूचना केल्या. यावेळी उपस्थित आमदार यांनी आपापल्या क्षेत्रातील विकास कामांचे प्रस्ताव व अडचणी पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी संबंधीत प्रशासनाला दिले.

कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे केले आवाहन

कोरोना बाबत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेत असताना त्यांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज असून संसर्ग रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. संपुर्ण राज्यात कोरोना रूग्ण वाढत आहेत. गडचिरोली जिल्हयातही वाढ निदर्शनास येत आहे. आता पुन्हा सर्व शासकिय यंत्रणांनी मागील कालावधीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

आपली प्रतिक्रिया द्या