गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांचे ऑपरेशन, दोन महिला नक्षलवाद्यांसह पाच ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त

फाईल फोटो

गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे. शनिवारी सकाळपासून खोब्रामेंढा आणि हेटाळकसाच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकी झाल्या. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांसह पाच नक्षलवादी ठार झाले तर सुमारे 60 नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. घटनास्थळी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.

गडचिरोलीतील खोब्रामेंढा जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. त्यात 3 पुरुष व 2 महिला नक्षलवादी असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नाकीनऊ आणले. पोलिसांच्या जबरदस्त कारवाईमुळे 60 नक्षलवाद्यांना घनदाट जंगलात पळ काढावा लागला.

खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठय़ा प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टीसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. त्यावर अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलातील सी-60च्या जवानांनी ही नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती. पोलिसांना पाहून नक्षलींनी गोळीबार सुरू केला. सुमारे 70 मिनिटे चकमक झाली.

पोलिसांनी घटनास्थळाहून 303 रायफल, काडतुसे, तीन प्रेशर कुकरबॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळीबॉम्ब जप्त केले. त्याचप्रमाणे औषधांचा साठाही सापडला.

आपली प्रतिक्रिया द्या