
देशातील पायभूत सुविधा प्रकल्पांसाठी परदेशी गुंतवणूक अजिबात घेणार नाही. त्याऐवजी देशातील सामान्य माणसाकडून एक लाख रुपये वार्षिक आठ टक्के व्याजावर घेऊ, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करावे, असे मला वाटत नाही. त्यापेक्षा शेतकरी, शेतमजूर, पोलीस कॉन्स्टेबल, क्लार्क आणि सरकारी कर्मचाऱयांकडून आम्ही पैसे गोळा करू आणि विकास प्रकल्प पूर्ण करू!
इलेक्ट्रिक बस फायदेशीर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस घेतल्या. तीन वर्षांपूर्वी मीही प्रयत्न केले. आता आदित्य ठाकरे यांनी बस घेतल्या, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी आदित्य ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले. इलेक्ट्रॉनिक बसला एका किलोमीटरला 50 रुपये खर्च होतो तर डिझेल बसला एका किलोमीटरला 110 रुपये खर्च होतो. माझ्याकडे इलेक्ट्रिक कार आहे. काही त्रास होत नाही, असे ते म्हणाले.
मुंबईत वॉटर टॅक्सी
मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. त्याचा धागा पकडत नितीन गडकरी म्हणाले की, दक्षिण मुंबईतून तेरा मिनिटात या वॉटर टॅक्सी नवी मुंबईतल्या विमानतळाच्या परिसरात जातील. देशातही वॉटर टॅक्सी सुरू करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.



























































