रक्तदानासाठी गणेशोत्सव मंडळे पुढे येणार, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबईतील ही समस्या दूर करण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती पुढे सरसावली आहे. येत्या काळात मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आवाहन समन्वय समितीतर्फे गणेशोत्सव मंडळांना केले आहे.

राज्यासह मुंबईत कोरोनाने कहर माजविला आहे. त्यातच राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याची माहिती राज्य सरकारतर्फे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. या सर्वांची गंभीर दखल घेत बृहन्मुंबई सार्वजनिक समितीने पुन्हा एकदा गणेशोत्सव मंडळांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले.

समन्वय समितीच्या या आवाहनाला अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. मुंबईतील लालबाग, परळ, काळाचौकी आणि अंधेरी येथील अनेक मंडळांनी लवकरच रक्तदान शिबीर आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली. याअगोदरदेखील समन्वय समितीने मंडळांना आवाहन केले होते, ज्यात मोठय़ा संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. त्यामुळे आता या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.