फळझाडांच्या बियांपासून साकारली गणेशाची प्रतिमा, विद्यार्थी गिरवताहेत निसर्गशाळेत धडे

निसर्गशाळेच्या माध्यमातून झाडाचा गणपती ही संकल्पना राज्यभरात राबवली जात आहे. या उपक्रमात मुलांनी भरभरून सहभाग घेतला आहे. कुणी बियांपासून गणरायाची प्रतिकृती साकारली आहे, तर कुणी विविध रोपं वापरून गणरायाची आकर्षक सजावट केली आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करतानाच निसर्ग संवर्धनाचे शिक्षण देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

निसर्गाच्या शाळेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे गिरवणाऱया चारठाणा, जिंतूर येथील आर्या विजय ढाकणे आणि अनया विजय ढाकणे या बहिणींनी फळ आणि फुलझाडांच्या बियांपासून श्रीगणेशाची प्रतिमा साकारली.

bappa-1

गेल्या लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने 12 वर्षांची आर्या आणि 6 वर्षांची अनया या दोघींनी निसर्गाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्यांनी घरात आणल्या जाणाऱया फळांच्या बिया फेपून न देता वर्षभर त्यांचे संकलन केले. त्यातून सुमारे 200 झाडांची रोपवाटिका तयार केली. उरलेल्या बियांपासून त्यांनी पर्यावरणपूरक गणेश प्रतिमा साकारली. आर्या-अनयाने फळझाडांच्या बियांमध्ये चिंच, रामफळ, सीताफळ, गुलमोहर तर फुलझाडांच्या बियांमध्ये गुलमोहर, बहावा आदी बियांचा वापर केला. साधारण 1100 बियांपासून त्यांनी 2 फूट उंच गणेश प्रतिमा तयार केली आहे. या गणरायाच्या प्रतिमेचे 10 दिवसांनंतर विसर्जन करून त्या बियांपासून रोपं तयार करणार आहोत. ज्यांना रोपं हवी आहेत, त्यांना पिंवा नातेवाईक, मित्रांना रोपं भेट देऊन वृक्षलागवड व संवर्धनाचे आवाहन करणार असल्याचे आर्या- अनयाने सांगितले.  आर्या- अनयाप्रमाणे श्रेया, पुशल सुरोशे (वसमत), तन्मय दुधाटे (पूर्णा), ऋषाली मोरे (भोगाव), विरुपाक्ष ढगे (नाशिक) आदी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

bappa-2

पर्यावरणाचे संतुलन राखूया

‘झाडाचा गणपती’ या उपक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यापैकी उत्पृष्ट नैसर्गिक गणपती बसवणाऱया विद्यार्थ्यांना ‘मूर्तिकार राम सुतार पुरस्कार’ दिला जाणार असल्याची माहिती ‘निसर्गाची शाळा’चे संस्थापक अण्णा जगताप यांनी दिली. पर्यावरणाचे संतुलन राखले गेले तर आपल्याला मोकळा श्वास घेता येईल. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून आपण ‘झाडाचा गणपती’ ही संकल्पना सुरू केली आहे. यंदा कोरोनामुळे उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. अशातच ‘झाडाचा गणपती’ची ही संकल्पना पुढे नेऊन निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी एक पाऊल पुढे पडेल, असे अण्णा जगताप म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या