
गोदामावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयते, सत्तुर, दुचाकी, मिरचीपुड, असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सदाशिव गंगाधार बोईवार (वय 25), अमोल राजाराम घाटे (वय 23), गौतम साहेबराव गायकवाड (वय 20), संकेत सुनिल लोणके (वय 19), आशिष देविदास रेड्डी (वय 20), प्रकाश रंगनाथ गायकवाड (वय 26) यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस रात्री गस्त घालत असताना साडे सतरानळी परिसरातील अॅमनोरा टाऊनशिपच्या पाठिमागे सराईत गुन्हेगार कोयते व इतर शस्त्र घेऊन गोदामावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून सातजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्या पथकाने केली.



























































