
सामना ऑनलाईन, पिंपरी
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाकड येथे पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब ही आहे की अटक केलेले सगळेजण उच्चशिक्षित असून त्यांच्याविरूद्ध यापूर्वीही काही गुन्ह्यांची नोद आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 9 पिस्तुलं आणि १३ जिवंत काडतुसं जप्त केली आहे.
अमोल सूर्यभान लेंडवे (३०, रा. गधंर्वनगरी, भोसरी), तुषार राजाराम सोंडकर (२८, रा.भोर), सोमनाथ कैलास चव्हाण (३१, रा. रायगड), अक्षय उर्फ सागर अरुण टिळेकर (२२, रा. दौड, पुणे) आणि सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (२५, रा. हवेली, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
एक व्यक्ती पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती दरोडा, खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी आशिष बोटके यांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाकड येथे सापळा रचला. यावेळी पोलिसांना एक जण संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतला आणि झडती घेतली. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अमोल लेंडवे असल्याचं सांगितलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून त्याच्या टोळीची माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या चार साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.
पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे, कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधावणे, गणेश हजारे, महेश खांडे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, विक्रात गायकवाड, नितीन लोखंडे, उमेश पुलगम, शरीफ मुलाणी, किरण खांडेकर, निशांत काळे, किरण काटकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, आशिष बनकर, प्रविण माने, सुधीर डोळस, नितीन खेसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.




























































