इन्स्टाग्रामवरील फोटोच्या वादातून टोळक्याचा राडा; अल्पवयीन गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावरील फोटो पोस्ट आता थेट खुनाच्या प्रयत्नापर्यंत पोहोचल्या आहेत. विशेषतः शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इन्स्टाग्राम, व्हाट्सअ‍ॅपची मोठी क्रेझ असून स्टेटस, डीपी ठेवण्याच्या वादातून दिवसेंदिवस मारहाणीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशीच एक घटना वडगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. इयत्ता दहावीमध्ये शिक्षणाऱ्या मुलाने इन्स्टाग्राम स्टेटस फोटो ठेवल्याच्या वादातून अल्पवयीन टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

संबधित अल्पवयीन टोळक्याला सिंहगड पोलिसांनी जेरबंद केले आहे. इन्स्टाग्रामवरील फोटो अपलोड करण्याच्या वादातून त्यांनी हल्ला केल्याची कबुली दिली. तक्रारदार अल्पवयीन मुलगा आंबेगाव दाभाडीत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. तो इन्स्टाग्रामवर दररोज दोन ते तीन फोटो अपलोड करतो. त्याच्या ओळखीतील काही अल्पवयीन मित्र परिसरात राहायला आहेत. तो मुलगा दररोज स्वतःसह इतरांचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करीत असल्याचा राग टोळक्याला होता. त्याच रागातून टोळक्याने रविवारी संबंधित मुलाला वडगाव बुद्रूकमधील घुलेनगर परिसरातील एटीएम सेंटरनजीक गाठले. त्याला इन्स्टाग्राम फोटो अपलोड करण्याचा जाब विचारून कोयत्याने वार केले. दोन्ही हातासह, डोक्यात वार करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर अल्पवयीन टोळक्याने हातात कोयते घेत परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम स्टेटस ठेवण्याच्या वादातून सहाजणांनी अल्पवयीनाला बेदम मारहाण करून त्याच्यावर वार केला. त्याशिवाय हातात कोयते घेउन परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी पाचजणांना ताब्यात घेतले आहे.
– दीपक कादबाने, सहायक पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे