
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
[email protected]
आपली वाट आपण शोधायला हवी, तिच्यावर चालण्याचं बळही आपणच कमवायला हवं ही समज देणारे गौरी देशपांडे यांचे लेखन स्त्रीला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर नेते. स्त्रीच्या संवेदनशीलतेचा खरा सूर त्यांच्या लेखनात सापडतो. म्हणूनच हे लेखन कालातीत म्हणावे लागेल.
गौरी देशपांडे ही 70च्या दशकामध्ये लिहायला लागलेली लेखिका. 60च्या दशकात जन्माला आलेल्या (आणि अर्थात वाचणाऱया) पिढीनं कृतज्ञतेनं म्हणयला हवं – आणि म्हणतेच – की, “आमचं तारुण्य गौरी देशपांडे यांच्या ‘एकेक पान गळावया’ने सजग बनवलं.’’ गौरी भेटेतो जे बरंच काही वाचलं होतं, त्यामुळे वाचक म्हणून एक प्रकारे काहीसं कंडिशनिंग झालं होतं. नायिका कशी… केतकी वर्णाची, केसांचा नागिणीसारखा शेपटा मिरवणारी, धनुष्याकृती भुवयांची! नायक रुबाबदार, देखणे. मग त्यांचं ठरावीक रस्त्यानं जाणारं प्रेम आणि गोड गोड संभाषणं! किती दूरस्थ वाटतात ती वर्णनं.
साहित्यात रूढ झालेल्या अनेक प्रथा नाकारल्या गौरीने. उंच-सडसडीत, लांब लांब बोटांचा, अनाग्रही, अबोल, पण अधूनमधून उपरोधिक बोलणारा पुरुष आणि असुंदर नायिका भेटली ती तिच्या या पुस्तकांत. किडक्या दातांची, हडकुळी, चष्मा लावणारी अशा वर्णनाची आणि तरी लोक-विशेषत पुरुष- वळून वळून आपल्याकडे का पाहतात? हा प्रश्न पडलेली. कारण तिचं खरं सौंदर्य आहे तिच्या आत्मनिर्भरतेत. ही ‘पुरुषासारखी’ स्वतंत्र, जगभर फिरणारी, नोकरी करणारी, मुलीची आई असणारी (मुलाची नव्हे!) पण रूढ आईपणा न करणारी. खरं तर कुठलाच रूढपणा न करणारी, दिलेली चौकट नाकारणारी, फटकळ, बुद्धिमान, स्वतचे निर्णय स्वतच घेणारी, प्रचंड उत्कट आणि संवेदनशील अशी नायिका त्यापूर्वी विशेष दिसली नव्हती.
दुस्तर हा घाट, मुक्काम, तेरुओ, गोफ इ. लघु कादंबऱयांतून स्वातंत्र्य हे मूल्य गौरीला किती महत्त्वाचं वाटत होतं, त्याचं प्रखर दर्शन घडतं. कारावासातून पत्रे ही पत्राच्या स्वरूपात लिहिलेली. कोणत्या कारावासात आहे ही नायिका? तर तो कारावास आहे अनेक रूढ समजुतींचा. अशा समजुती ज्या बाईचं आयुष्य बंदिस्त करतात. विवाह करण्याची, कुटुंबासाठी खस्ता खाण्याची, कौटुंबिक नात्यांच्या विविध भूमिका बजावण्याची सक्ती, आई होण्याची सक्ती, चांगलं आणि आकर्षक दिसत राहण्याची, नवऱयाला वा प्रियकराला सतत आवडत राहण्याची सक्ती, मन मारून संसार ओढत राहण्याची सक्ती, माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी अवलंबून राहण्याची वृत्ती हा आणखी एक कारावास. सहसा ही कारागृहं कोणाला दिसतच नाहीत. ज्याला दिसतात, काचतात तो त्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्न करतोच असं नाही. हे गौरी इतकं बिंबवते की, खऱया आत्मनिर्भरतेची व्याख्या स्वतसाठी करणं शक्य वाटतं आणि या आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर वाटाडय़ा उपयोगाचा नसतो हेही तिनेच सांगून ठेवलंय. आपली वाट आपण शोधायला हवी, तिच्यावर चालण्याचं बळही आपणच कमवायला हवं हे समजणं ही गौरीची देणगी. त्या पूर्वी इतकं स्पष्टपणे, इतक्या धारदार शब्दांत असं म्हटलं नव्हतं कुणी. त्यामुळे ही नायिका सहज झेपणारी नव्हतीच. आजही नाही. कारण अगदी भावनिकदृष्टय़ाही कोणावर अवलंबून न राहणं अवघडच, पण तोही एक रस्ता आहेच, असतो हेही समजतं ते तिच्याचमुळे. सगळं काही पटतं असं अर्थात नाही.
तिची नायिका स्वतला सतत भिंगाखाली ठेवते. निरखते, पारखते, सोलून काढते. स्वतला काय हवंय, हे बघायला शिकवते. अलीकडे आलेल्या काही नाटकांतून, सिनेमांतून असे विषय हाताळले जातात. स्त्राrकेंद्रित मांडणी संवेदनशीलतेने केलेली दिसते, त्याचं श्रेय काही अंशी तरी नक्कीच गौरीने ही जी भूमी तयार केली त्याला जातं. स्त्राrचं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य जरा उच्च स्वरात सांगावं लागणं हा गौरीच्या काळाचा निर्णय होता. गौरीनंतर लिहिणाऱया लेखकांच्या पिढीलाही तिने निर्माण केलेल्या वाटा बळ देणाऱ्या ठरल्या.
गौरीच्या लेखनात यत्किंचितही भावुकता नाही, ऊरबडवा आक्रोश नाही आणि तरी एका प्रगल्भ कारुण्याचा प्रत्यय ते देते. ‘आहे हे असं आहे’ या शीर्षकात वरवर पाहता नाइलाजाने केलेला स्वीकार आहे, असं वाटलं तरी विलक्षण अशा अंतस्थ वेदनेचा सूर त्यामागे आहे.
पुरुषप्रधान मानसिकता ठासून भरलेला आजूबाजूचा भवताल कळायला गौरीचं लेखन मदत करतं. गाभ्यात अत्यंत संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारं आणि झोपी गेलेल्याला खडबडून जाग आणणारं हे लेखन आहे. जगत असताना मनावर, विचारांवर चढणारी पुटं झाडून टाकायला मदत करणारं.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)





























































