
>> प्रसाद नायगावकर
राज्यभरात तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेली प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सातत्याने चर्चेत असते. गौतमी आणि राडा असं नवं समीकरण तयार होताना दिसत आहे. म्हणजे एखादा कार्यक्रम शांततेत पार पडला तरी त्याची बातमी होते. यावरुन याचं महत्त्व लक्षात येऊ शकते. असाच एक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातून समोर आला आहे. वणी येथे गौतमी पाटील यांच्या संचानी नृत्याला सुरवात करताच तरुणाई बेभान झाली होती. तो जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि “पाटलाचा बैल गाडा” पर्यंत असणारा नृत्याचा प्रवास अक्षरशः प्रेक्षकांना चेतवणारा होता. यावेळी बाहेरच्या भागात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बाजीरावाचा चोप सुध्दा दिला. आणि त्यानंतर संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.
सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलचा शो पुन्हा चर्चेचा ठरला. ऍड. कुणाल विजय चोरडीया यांचे अध्यक्षतेखाली T-10 चॅम्पियन्स लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्ताने प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या बहारदार नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. T-10 चॅम्पियन्स लीगचे उद्घाटन गौतमी पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वणी व परिसरातील नागरिकांनी प्रचंड उपस्थिती दर्शवली.गौतमी पाटील यांची दिलखेचक अदा आणि घायाळ तरुणाई यावेळी बघायला मिळाली. जिल्ह्यात प्रथमच गौतमी पाटील यांच्या नृत्याचे आयोजन करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. त्यातच आयोजन समितीने मोठया प्रमाणात बॉक्सरला तैनात केले होते. प्रचंड माहोल, थिरकणारे तरुण, चाललेली चेंगड यामुळे पोलीस आणि बॉक्सर यांची चांगलीच तारांबळ उडाली. गौतमीच्या दिलखेचक अदा पाहून काही तरुणांनी हुल्लडबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणला . पण पोलिसांनी चोप देताच ही अतिउत्साही मंडळी शांत झाली .आणि कार्यक्रम शांततेत पार पडला .
—


























































