आत्महत्येचं गूढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • गायत्री जोशी

आत्महत्येमागे अपयश किंवा ताण हीच कारणे असतात हा गैरसमज आहे. आत्मघाताची विविध कारणे असू शकतात. मुळात ताण येण्याची फक्त वैयक्तिक किंवा आर्थिक कारणेच असतात हा अजून एक मोठा गैरसमज आहे. आत्महत्येची अनेक कारणे असू शकतात. मानसिक आजार, व्यसनाधीनता, शारीरिक आजारामुळे मेंदूतील अंतःस्रावी ग्रंथींमध्ये होणारे बिघाड, घरामध्ये पूर्वी घडलेल्या आत्महत्या, अचानक बसलेला तीव्र मानसिक धक्का किंवा जगण्यासाठी पुरेसं कारण नसणे अशी विविध कारणे असू शकतात.

गेल्या वर्षभरात अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्येच्या बातम्या वाचायला मिळाल्या. कोणी आत्महत्या केली की, ‘लोकांना आयुष्याची किंमत नाही’पासून ते ‘मरणारा कमकुवत मनाचा होता, त्याला ताण सहन झाला नाही,’ अशी अनेक ठोकळ मतं आपण मांडून मोकळे होतो. आपल्या या मतप्रदर्शनामुळे मयताच्या कुटुंबाला किती त्रास होतो याची कल्पना आपल्याला नसते.

आत्महत्या इतकी सोपी नसते. मुळात आत्महत्येमागे अपयश किंवा ताण हीच कारणे असतात हा गैरसमज आहे. आत्मघाताची विविध कारणे असू शकतात. मुळात ताण येण्याची फक्त वैयक्तिक किंवा आर्थिक कारणेच असतात हा अजून एक मोठा गैरसमज आहे. तसं असतं तर आर्थिक डबघाईला आलेल्या प्रत्येकानं आत्महत्या केली असती.

आत्महत्येची अनेक कारणे असू शकतात. मानसिक आजार, व्यसनाधीनता, शारीरिक आजारामुळे मेंदूतील अंतःस्रावी ग्रंथींमध्ये होणारे बिघाड, घरामध्ये पूर्वी घडलेल्या आत्महत्या, अचानक बसलेला तीव्र मानसिक धक्का किंवा जगण्यासाठी पुरेसं कारण नसणे अशी विविध कारणे आहेत.

मानसिक आजारांमध्ये क्लिनिकल डिप्रेशन असल्यास आत्महत्येचे विचार तीव्र असतात. त्याचबरोबर स्किझोफ्रेनिया, बायपोलार आणि बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर अशा आजारात आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळते. त्याचबरोबर मज्जासंस्थेचे दुर्मिळ आजार असणाऱ्या व्यक्तींना मज्जासंस्थेतील बिघाडामुळे आत्महत्येचे विचार येत असतात. यात बळी पडणारी संख्याही अधिक आहे. जसे मल्टिपल स्केलरॉसीस या आजारात क्लिनिकल डिप्रेशनचा त्रास होतो आणि आत्महत्येचे विचार किंवा प्रयत्न केले जातात. आपण मात्र त्याच्या आजाराला कंटाळून रुग्णाने आत्महत्या केली असे म्हणतो. फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया या डिमेंशियाच्या दुर्मिळ प्रकारातही मानसिक आजाराची लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. अशा वेळी जर रुग्णाने आत्महत्या केली किंवा प्रयत्न केला तर ती ताणामुळे नसून आजारामुळे असते.

सध्या चालू असलेल्या संशोधनानुसार असाध्य आजारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे किंवा स्टिरॉइड्समुळे मेंदूतील स्रावांची पातळी बिघडून हिंसक वृत्ती, डिप्रेशन, चीडचीड, ताण, राग, वैताग निर्माण होऊन वाढू शकतो, ज्याचा परिणाम म्हणून व्यक्ती आत्महत्या करू शकते. गेली तीन दशके चालू असणाऱ्या या संशोधनातून आता हे सिद्ध झाले आहे.

मानसिक आजार आणि मेंदूतील बिघाडानंतर जगभरात आत्महत्येचे दुसरे प्रमुख कारण व्यसनाधीनता आहे. दारू तसेच अमली पदार्थांचा सातत्यपूर्ण आणि अतिवापर यामुळे व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होऊन व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे नातेसंबंध आणि व्यावसायिक संबंध बिघडल्याने व्यक्ती अजूनच खच्ची होते. त्यामुळेही आत्महत्येचे प्रकार घडतात.

जगभरातील आत्महत्येचे गुणोत्तर सांगते की, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्मघाताचे विचार अधिक येतात. तसेच पुरुष अधिक प्रमाणात आत्महत्या करतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरुषांवर कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी असते. अर्थात हे सामाजिक कारण आहे. मात्र या सामाजिक कारणांमुळेच पुरुष अधिक आत्महत्या करताना दिसतात. स्त्रियांची सहनशीलता आणि परिस्थितीसोबत दोन हात करण्याची मानसिक कुवत आणि आजारांशी झुंजण्याची शारीरिक क्षमता पुरुषांपेक्षा अधिक असल्याने त्यांच्यात आत्मघाताचे विचार कमी प्रमाणात येतात. आपण घरातील सदस्यांसाठी जबाबदार असलो तरीही अडचणीच्या काळात त्यांना मदत मागणे किंवा आपल्या अडचणी त्यांना सांगणे असे केल्यास पुरुषांचा ताण हलका होऊ शकतो. पर्यायाने त्यांची आत्मघाती वृत्ती नियंत्रणात राहाते.

त्याचबरोबर मुलग्यांना रडू देणे, मनमोकळ्या गप्पा मारू देणे यामुळे पुढे जाऊन त्यांचा कुटुंबाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन तयार होऊन मानसिक आजार होण्याची शक्यता कमी होते.

तरीही गेल्या एका शतकात जशी स्त्री घराबाहेर पडून कमावती झाली आहे तेव्हापासून स्त्रियांच्या मानसिक ताणातही वाढ झाल्याचे विविध संशोधनांतून समोर आले आहे. जगभरात आजही घर, मुले ही स्त्रीचीच जबादारी समजली जाते. त्याचबरोबर नोकरी आणि अर्थार्जनही करावे लागत असल्याने महिलांना येणार ताण त्यांना आत्मघाताकडे नेऊ शकतो.

स्त्रियांच्या बाबतीत हार्मोनल इम्बॅलन्स, प्रसूतीपूर्व डिप्रेशन आणि प्रसूतीपश्चात डिप्रेशन या कारणांमुळेही आत्मघातासारखे प्रकार होऊ शकतात. त्यातही मधुमेह किंवा उच्च रक्तदाब या सारखे आजार असतील तर नवमातांमध्ये येणाऱ्या क्लिनिकल डिप्रेशनचं तसेच आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे.

यापुढे जर कोणाच्या आत्महत्येची बातमी ऐकलीत तर कृपया त्या व्यक्तीवर पळपुटा, कचखाऊ किंवा कमकुवत असा शिक्का न मारता कारण जाणून मगच टिप्पणी करा.

(लेखिका मानसोपचार तज्ञ व समुपदेशक आहेत.)