
जर्मनीच्या फुटबॉल संघाला ऑक्टोबर महिन्यात तीन आंतरराष्ट्रीय लढती खेळावयाच्या आहेत. तुर्की, स्वित्झर्लंड व युक्रेन यांच्याविरुद्ध होणाऱया लढतींसाठी जर्मनीच्या संघात तब्बल 29 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना प्रशिक्षक जोकीम लोव म्हणाले, आम्ही तीन लढतींसाठी जादा खेळाडूंची निवड केलीय. आम्हाला विविध पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, दुखापत असूनही जर्मनीच्या संघात टोनी क्रूस या खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे. प्रशिक्षक जोकीम लोव यांना आगामी तीन लढतींसाठी दोन भिन्न संघ मैदानात उतरावयाचे आहेत. तुर्की या देशाविरुद्ध मायदेशात होणाऱया फ्रेंडली लढतीसाठी एक संघ खेळवणार असून त्यानंतर होणाऱया नेशन्स लीग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील युक्रेन व स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीसाठी प्रमुख संघ मैदानात उतरवण्याची योजना बनवण्यात आली आहे.




























































