राफेल प्रकरण: पर्रिकरांच्या जीवाला धोका; सुरक्षा वाढवण्याची काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

राफेल प्रकरणावरून भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. संसदेच्या अधिवेशनातही या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राफेल कराराशी संबंधित असल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे, असे वादग्रस्त विधान केले आहे. पर्रिकरांना धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी गोवा काँग्रेसने राष्ट्रपतींना पत्र पाठवून केली आहे. राफेल करार करण्यात आला, त्यावेळी पर्रिकर संरक्षणमंत्री होते. तसेच नुकत्याच उघड झालेल्या ऑडिओ क्लिपवरून आपल्या बेडरुममध्ये राफेलच्या फाईल असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राफेल कराराचे पुरावे मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे पर्रिकरांची सुरक्षा वाढवण्याची मागणी गोवा काँग्रेसने केली आहे.

राफेल करारामगील सत्य ज्यांना लपवायचे आहे, त्यांच्याकडून पर्रिकरांवर हल्ला होण्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. उघड झालेल्या एका ऑडिओ क्लिपमधून पर्रिकर यांचे नाव या प्रकरणात आले होते. राफेलमधील भ्रष्टाचार उजेडात येऊ नये आणि या बाबतची कोणतीही माहिती उघड होऊ नये, असे वाटणारे काहीजण पर्रिकरांकडून त्या फाईल मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे पर्रिकर यांच्या जीवाला धोका असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेसने उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमधील संवाद बोगस असून पर्रिकर आणि विश्वजीत राणे यांनी या ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याआधारे काँग्रेस भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे.