कापसाच्या सुताआडून गोवा मेड दारुची वाहतूक, संगमनेरात 69 लाखांची दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कापसाचे सूत असल्याचे भासवून गोवा राज्यनिर्मित असलेले लाखो रुपयांची मद्य वाहतूक करणारा कंटेनर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात पकडला. यामध्ये 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला असून, वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूर्यनारायण रामचंद्र शिरसाट (वय 35, रा. सम्राट अशोकनगर, एस. सी. छागला रोड, सीपीडब्ल्यूडी ऑफिसजवळ, विलेपार्ले (पूर्व), सहार पी ऍण्ड टी कॉलनी, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.

कंटेनरमधून मोठय़ा प्रमाणावर ‘गोवा मेड’ दारू संगमनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, नगरचे अधीक्षक गणेश पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या भरारी पथकाने वेल्हाळे शिवारात एक कंटेनर पकडला. या कंटेनरच्या चालकाकडे पथकातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, चालकाने कापसाचे सूत नेत असल्याचे सांगितले. त्याची ‘अव्हीजी लॉजिस्टिक लि., दिल्ली’ या ट्रान्स्पोर्ट कंपनीची बिल्टी व खजुरिया टेक्सटाइल मिल, नवी मुंबई यांची इन्व्हाइस कॉपी दाखविली. परंतु गाडीमध्ये मद्यच असल्याच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी या वाहनाची मागील बाजूस असलेले सील उघडून तपासणी केली. या वाहनात गोवा राज्यनिर्मित व विक्रीस परवानगी असलेले रॉयल ब्ल्यू मॉल्ट व्हिस्कीच्या 38 हजार 352 बाटल्या, किंगफिशर स्ट्राँग बीअरच्या 2304 बाटल्या यांसह एक आयशर कंटेनर असा एकूण 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सूर्यनारायण रामचंद्र शिरसाठ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, संजय बोधे, एस. एन. इंगळे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश सुळे, जवान स्टाफ प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख, भारत नेमाडे, शशांक झिंगळे, सतीश पोंधे, अनिल थोरात, तसेच स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आर. डी. वाजे, ए. जे. यादव, एस. आर. वाघ, जवान विजय पाटोळे, सचिन गुंजाळ, तौसिफ शेख यांनी सहभाग घेतला.