
अन्योअदयं घर्ष शिलायां दह वा दाहेन भिन्दि लोहेन । हे हेमकार ! कनकं मा मां गुञ्जाफलैस्तुलय।।
हे सोनारा! सोन्याला दगडावर घास, अग्नीत तापव, उष्णतेने जाळ, लोखंडाने त्याचे तुकडे कर; मात्र मला गुंजांच्या बियांशी तोलू नकोस.
अर्थ स्पष्टीकरण – ही अन्योक्ती सोन्याच्या तोंडून सोनाराला उद्देशून आहे. सोने म्हणते, ‘माझी शुद्धता तपासण्यासाठी मला कसोटीच्या दगडावर कितीही घास, आगीत तापव, अगदी लोखंडाने तोडूनही पाहा; हे सारे कठोर परीक्षेचे प्रकार मी सहन करीन. पण माझे मूल्य ठरवताना मला गुंजांच्या बियांबरोबर तराजूत तोलू नकोस.’ येथे सोन्याच्या रूपकातून गुणी, श्रेष्ठ किंवा स्वाभिमानी व्यक्तीची भावना व्यक्त झाली आहे. अशा व्यक्तीला कठोर परीक्षा, संकटे किंवा कष्ट यांची भीती नसते; परंतु आपली तुलना आपल्यापेक्षा गुणांनी किंवा योग्यतेने अत्यंत कमी असलेल्या व्यक्तीशी केली जाणे तिला अपमानास्पद वाटते. त्यामुळे कष्ट किंवा परीक्षा यांपेक्षाही अयोग्य व्यक्तीशी केलेली तुलना श्रेष्ठ व्यक्तीला अधिक असह्य होते.
– डॉ. समिरा गुजर-जोशी





























































