
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3141 ने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘रोटासायन्स’ प्रदर्शन आणि स्पर्धेला सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गव्हर्नर संदीप अगरवाल यांच्या टीमने मुंबई शहर आणि पालघर, विरारमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांच्या विचारशक्तीला आणि सर्जनशीलतेला वाव देणे आणि त्यातून त्यांना काहीतरी शिकायला मिळावे या उद्देशाने या विज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कामासाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई, रोटरी क्लब ऑफ मुंबई पवईचे सविता गोविलकर, विवेक गोविलकर, रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या मंजू उधासी, घाटकोपर वेस्टचे पिल्लई, श्रुती आणि जयेश बदानी यांनी हिरिरीने 100 पेक्षा जास्त शाळांशी संबंध साधला. राजेंद्र उन्नीकृष्णन यांनी समन्वयक म्हणून आपली भूमिका उत्तमपणे पार पाडली, तर रोटरी पवईच्या अध्यक्षा कल्पना जयशंकर यांनी निमंत्रक म्हणून हा प्रकल्प समर्थपणे तडीस नेला, अशी माहिती अगरवाल यांनी दिली. स्पर्धेत एकूण 62 शाळांनी भाग घेतला.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी विविध विषय हाताळले. त्यात पर्यावरण, शाश्वत ऊर्जा स्रोत, स्मार्ट सिटी, यंत्रमानव या विषयांचा समावेश होता. काहींनी शेतीची अवजारे, पिकांचे नुकसान करणारी पाखरे हाकलण्यासाठी आवाज करणारी बंदूक, नदीची साफसफाई करणारी यंत्रे, ओला-सुका-धातू कचरा वेगळा करण्याचे साधन अशा प्रकारचे प्रकल्प प्रात्यक्षिकांसह सादर केले. ही स्पर्धा आता यापुढे दरवर्षी आयोजित करणार असल्याचेही अगरवाल म्हणाले.





























































